टंचाईने ग्रामीण भागाच्या तोंडचे पाणीच पळवले!
By जितेंद्र दखने | Published: June 7, 2024 08:51 PM2024-06-07T20:51:48+5:302024-06-07T20:52:10+5:30
१३ गावांत १७ टँकर, ८३ ठिकाणी ३७ बोअरवेल, ६३ विहिरींचे अधिग्रहण
अमरावती : मेअखेरीस आणि जून महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची दाहकता वाढली असून, १४ पैकी ११ तालुक्यांत टंचाईची तीव्रता अधिक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील १३ गावांत १७ खासगी टँकरद्वारे तर ८३ गावांमध्ये ३७ बोअरवेल व ६३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे २५ हजारांवर नागरिकांना खासगी टँकर व खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत.
जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील ९६ गावांतील जवळपास ४० हजार नागरिकांना खासगी टँकर व खासगी बोअरवेल आणि अधिग्रहित विहिरींद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. परिणामी पाण्यासाठी हजारो ग्रामस्थांना प्रामुख्याने गृहिणींना भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील दाेन तालुक्यांतील १३ गावांना १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यातील बेला सलोना, मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार, आलाडोह, लवादा, गवळीढाणा कोरडा, स्कुलढाणा, कालापांढरी आदी गावांमध्ये १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे १४ पैकी ११ तालुक्यांतील ८३ गावांची तहान ६३ अधिग्रहित विहिरी आणि ३७ बोअरवेलवरून भागविली जात आहे.
तालुका- गावे- बोअरवेल, विहीर संख्या
अमरावती-१०-०५-०७
तिवसा-०७-०१-०५
भातकुली-०१-००-०१
चांदूर रेल्वे-०३-००-०३
धामणगाव रेल्वे-०२-००-०२
नांदगाव खंडेश्र्वर-१७-००-१८
अचलपूर-०३-०७-०३
मोर्शी-१४-०४-१२
वरूड-०२-००-०२
धारणी-०८-०६-०४
चिखलदरा-१६-१४-०६
पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता टंचाई आराखड्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. सध्या १३ गावांत १७ टँकरद्वारे तर ८३ गावांमध्ये ३७ बोअरवेल व ६३ विहीर अधिग्रहणाद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागामार्फत मागणीनुसार तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत.
- सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग