एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा
By admin | Published: June 8, 2014 11:34 PM2014-06-08T23:34:05+5:302014-06-08T23:34:05+5:30
खरीप हंगाम २0१४-१५ साठी जिल्ह्यात सोयाबीनसाठी सरासरी २,0१,२00 हेक्टर पेरणीक्षेत्र असताना किमान ३,७५,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी कमीत कमी २ लाख क्विंटल बियाण्यांची
अमरावती : खरीप हंगाम २0१४-१५ साठी जिल्ह्यात सोयाबीनसाठी सरासरी २,0१,२00 हेक्टर पेरणीक्षेत्र असताना किमान ३,७५,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी कमीत कमी २ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात एकूण गरजेच्या तुलनेत किमान १ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा यंदा जाणवणार आहे. महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडे फक्त २५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याने इतर खाजगी कंपन्या किमान १ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करतील, अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने आतापासून सोयाबीनची चढय़ा भावात विक्री व काळाबाजार सुरू झाला आहे.
जिल्ह्यात सोयाबीन बियाणे टंचाईचे सावट असल्याने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी २८ एप्रिल २0१४ रोजी सोयाबीन उत्पादन कंपन्यांची बैठक घेऊन उत्पादित बियाणे जिल्ह्यातच विकण्याचे आदेश या कंपन्यांना दिलेत. १५ ते २0 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रत्यक्षात कृषी विभाग मात्र खासगी कंपन्यांकडून किमान एक लाख क्विंटल सोयाबीन, बियाणे उपलब्ध होईल तसेच महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडून ३५ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धी होऊ शकेल या वांझोट्या आशेवर आहे. सोयाबीनचे प्लॉटदेखील उगवणशक्तीच्या परीक्षेत नापास ठरले आहे. खरीपपूर्व आढावा सभेत राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात ७८ हजार किलो बियाण्यांचा तुटवडा असल्याची जाहीर कबुली दिली. प्रत्यक्षात हा तुटवडा यापेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे सोयाबीनची चढय़ा भावात व काळाबाजारात विक्री होत आहे. याला पायबंद घालणे तूर्तास कृषी विभागाचे भरारी पथक सपशेल फेल झाले आहे.
जिल्ह्यात १0४८ कृषी निविष्ठा केंद्रधारक आहेत. यासह वितरक व किरकोळ विक्रेत्यांनी एक लाख क्विंटलवर सोयाबीन बियाण्यांची मागणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे नोंदवली. प्रत्यक्षात मागणीच्या २५ टक्के पुरवठा खरिपाच्या तोंडावर झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.