राजापेठ येथून बसफेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित
By admin | Published: May 2, 2016 12:28 AM2016-05-02T00:28:06+5:302016-05-02T00:28:06+5:30
विभागातील शहराअंतर्गत अमरावती ते बडनेरा मार्गावर राजापेठ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ....
अमरावती : विभागातील शहराअंतर्गत अमरावती ते बडनेरा मार्गावर राजापेठ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शाॅिप्ींग कॉम्प्लेस व बसस्थानकांहून सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक आणि प्रवास भाडे निश्चित करण्यात आले आहे. या बसस्थानकाचे उद्घाटन नुकतेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे हस्ते करण्यात आले, हे विशेष.
मध्यवर्ती बसस्थानक अमरावती येथून सुटणाऱ्या नागपूर, अकोला, यवतमाळ या मार्गावरील सर्व फेऱ्या राजापेठ या नवीन बसस्थानकावरून ये-जा करतील. परंतु नागपूरकडून येणाऱ्या व पुढे अकोलाकडे जाणाऱ्या फेऱ्या या मध्यवर्ती बसस्थानकाच्या मध्ये प्रवेश न करता स्थानकांबाहेर प्रवाशांना उतरुन थेट राजापेठ बसस्थानक येथे जातील व पुढे मार्गस्थ होतील.
नागपूर मार्ग वर्ग होत असल्याने अंतर व प्रवासी भाड्यात होणारी तफावत स्पष्ट करण्यात आली आहे. यात नागपूरकडून येणारी व अमरावती येथे टर्मिनेट होणारी फेरी राजापेठ नवीन बसस्थानकांवर वर्ग होणार असल्याने फेरीच्या अंतरामध्ये २.२ कि. मी वाढ होऊन १५८.०३ कि. मी अंतर होईल. त्यामुळे राजापेठ येथे जाणाऱ्या व येथून नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांस २६ टप्पे म्हणजेच २७ टप्प्याचे भाडे अदा करावे लागेल. परंतु नागपूरकडून येणाऱ्या व पुढे अकोला किंवा यवतमाळकडे जाणाऱ्या फेऱ्याच्या अंतरामध्ये बदल होणार नाही. त्यामुळे प्रवास भाड्यामध्येसुध्दा वाढ होणार नाही.
अकोलाकडून येणारी आणि अमरावती मध्यवर्ती स्थानकांवर टर्मिनेट होणारी फेरी राजापेठ येथे वर्ग होणार असल्याने फेरीचे अंतर २.२ कि. मी ने कमी होवून ९६.१ कि. मी अंतर होईल. त्यामुळे अकोला ते राजापेठ स्थानक किंवा पुढे जाणाऱ्या प्रवाशांच्या अंतरामध्ये कमी येत असल्याने १७ टप्पे ऐवजी १६ टप्प्याचे भाडे आकारणी करावी लागेल. परंतु अकोलाकडून येणाऱ्या व नागपूर किंवा पुढे जाणाऱ्या फेऱ्यांच्या अंतरामध्ये बदल होत नाही. तसेच भाड्यामध्येसुध्दा वाढ होणार नाही.
अमरावती विभागातील अमरावती - वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, चांदूररेल्वे आगाराच्या अमरावती मार्गे अकोला व पुढे जाणाऱ्या व येणाऱ्या फेऱ्यांंच्या अंतरामध्ये बदल होणार नाही. परंतु राजापेठ येथून बसणाऱ्या व अकोला मार्गावर जाणाऱ्या प्रवाशाचे भाडे एक टप्याने कमी होणार आहे. तसेच राजापेठ येथे उतरणाऱ्या प्रवाशांचे सुध्दा भाडे एक टप्याने कमी होईल.
यवतमाळकडून येणारी व मध्यवर्ती स्थानकांवर टर्मिनेट होईल. त्यामुळे फेरीच्या अंतरामध्ये २.२ कि. मी. कमी होवून अंतर होईल यवतमाळ ते राजापेठ स्थानक व राजापेठ स्थानक ते यवतमाळ किंवा पुढे जाणाऱ्या प्रवाशांच्या अंतरामध्ये कमी होत असल्याने १६ टप्पे ऐवजी १५ टप्पे भाडे द्यावे लागेल. परंतु यवतमाळकडून येणाऱ्या व नागपूर किंवा पुढे जाणाऱ्या फेऱ्यांच्या अंतरामध्ये व भाड्यामध्ये बदल होणार नाही.
राजापेठ येथून बसणाऱ्या आणि यवतमाळ मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची भाडे एक टप्याने कमी होईल. राजापेठ बसस्थानकाहून प्रवाशांना ही सुविधा २५ एप्रिलपासून सुरु करण्यात आली आहे. अकोला आणि यवतमाळ मार्गावरील बहुतांश बस फेऱ्यांची वाहतूक मध्यवर्ती बसस्थानकांवर पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
त्याऐवजी ही बस वाहतूक राजापेठ येथील बस्थानकाहून सुरु करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक, राज्य परिवहन यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)