खिरगव्हाण ग्रामपंचायतीकडून मुलींसाठी मुदत ठेवीची योजना, सरपंचांची संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 01:24 PM2018-02-24T13:24:39+5:302018-02-24T13:24:39+5:30
स्त्री जन्माविषयी प्रोत्साहनासाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे.
अमरावती- स्त्री भ्रूणहत्या थांबविणे व कन्या जन्माला प्रोत्साहन यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जात असताना समानतेसाठी आपला कुठेतरी हातभार लागावा या दृष्टिकोनातून तालुक्यातील खिरगव्हाण ग्रामपंचायतीच्यावतीने स्त्री जन्माविषयी प्रोत्साहनासाठी शनिवार, १७ फेब्रुवरी २०१८पासून एक अभिनव योजना सुरू केली असून गावात मुलगी जन्माला आली तर तिच्या नावाने ग्रामपंचायत दोन हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट करणार, शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीच्या नावानेसुद्धा दोन हजार रुपये जमा करणार आहे. सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना सुरू करण्यात आली असून, सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
तालुक्यातील खिरगवहाण (समशेरपूर) ग्रामपंचायत एक हजार लोकसंख्या वस्तीचे छोटेसे गाव आहे. वर्षभरापूर्वी येथे थेट जनतेतून निवडून आलेले युवा सरपंच पुरुषोत्तम घोगरे विराजमान झाले. युवा व कल्पक वृत्तीचे असल्याने त्यांनी गावाच्या कायापालट करण्याचा संकल्प केला व प्रथम शिक्षणाला प्राधान्य देऊन कार्य सुरू केले. गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था सुधारली व स्वच्छ महाराष्ट्र अभियानाल सहभागी होऊन संपूर्ण गाव स्वरुप केले. गाव पूर्णपणे हगणदारीमुक्त होऊन हगणदारीच्या परिसरात बगीचाचे सुशोभीकरण व संत गाडगेबाबांचे स्मारक उद्यान तयार झाल्याने येथे एकेकाळी शौचाय जायचे आज त्याच भागात लोकांनी डबे पार्टी करावे, असे परिवर्तन घडले.
आज ग्रामपंचायतच्या वतीने स्त्रीजन्म प्रोत्साहनला चालणा देणारी अभिनव योजना सुरू करण्यात आली असून, महाराजांना व पहिल्या उपक्रम असावा, गावात मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावे २ हजार रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात येणार. शिवाय गावातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीच्या नावानेसुद्धा दोन हजार रुपये भरणार. आज शनिवारी सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी ग्रामसेवक इतर सदस्य पोलीसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सहकार्याने वासियांसमोर या उपक्रमाची घोषणा केली. याचे तालुक्यातील सर्व स्तरातून स्वागत होत असून, ग्रामपंचायतवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आज स्त्री पुरुष सामाजिक असमतोल बघता भविष्यातील चित्र भयावह आहे. त्यामुळे या समानतेसाठी आपला कुठेतरी हातभार लागलावा, यादृष्टिकोणातून या उपक्रमाचे पावलं उचलली असून गावकऱ्यांच्या साथीने निश्चितच याला क्रांतीचे रुप येईल. या संकल्पनेचा झालेला ठराव घेतला असून, माझ्या सहकारी सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सहकार्याने या योजनेचा प्रारंभ केला असे सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी सांगितले.