शाळाही उघडली, पण घंटा वाजलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:55+5:302021-06-29T04:09:55+5:30
नांदगाव खंडेश्वर : आज शाळा उघडली. गुरुजनांचीही हजेरी लावली, पण शाळेची घंटा वाजलीच नाही. विद्यार्थ्यांविना वर्गखोल्या ओस पडल्या ...
नांदगाव खंडेश्वर : आज शाळा उघडली. गुरुजनांचीही हजेरी लावली, पण शाळेची घंटा वाजलीच नाही. विद्यार्थ्यांविना वर्गखोल्या ओस पडल्या होत्या. येथील नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी दुपारी १ वाजता फेरफटका मारला असता, या विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले. शाळा उघडली असली तरी विद्यार्थ्यांची किलबिल मात्र वर्गखोल्यांमध्ये पाहायला मिळाली नाही. तुरळक विद्यार्थी नवीन प्रवेशाकरिता पालकांसह आले, तर काही विद्यार्थी पाठ्यपुस्तके मागील वर्षाची पुस्तके जमा करणे व या शैक्षणिक सत्रातील नवीन पाठ्यपुस्तके घेण्यासाठी आले होते. शिक्षकांनी नवप्रवेशित विद्यार्थी व पालकांशी हितगूज केली. काही शिक्षक गतवर्षीचा दहावीचा निकाल बोर्डाला सादर करण्याकरिता कामात व्यस्त दिसले. काही शिक्षक नव्या शैक्षणिक सत्रातील आपापल्या वर्गानुसार पटसंख्येचे नियोजन करण्यात व्यग्र होते. नवीन शैक्षणिक सत्रातील शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत १०० टक्के शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या नियोजनात शिक्षकांचा दिवस गेला, अशी प्रतिक्रिया नांदगाव हायस्कूलच्या पर्यवेक्षक संगीता दिवान यांनी व्यक्त केली.
===Photopath===
280621\1332-img-20210628-wa0005.jpg
===Caption===
गुरुजनांची हजेरी, विद्यार्थ्या विना वर्गखोल्या मात्र ओस.