शाळेत तयार होत आहे रद्दी पुस्तकांचे गोदाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:10+5:302021-07-02T04:10:10+5:30
सुमित हरकूट चांदुर बाजार : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शासनातर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपयांची ...
सुमित हरकूट
चांदुर बाजार : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शासनातर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपयांची पुस्तके मोफत वाटप केली जातात. मात्र, बदलती शिक्षण पद्धती व अभ्यासक्रमामुळे शाळांमध्ये दरवर्षी पुस्तकांचे गोदाम भरू लागले आहे.
राज्यात दीड वर्षापासून जरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे तरी मागील वर्षापर्यंत सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासकीय, अनुदानित व जिल्हा परिषद शाळेतील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तकांचे वाटप केले जात होते. आज कागदाच्या वाढत्या किमती आणि आधुनिक पुस्तक बांधणीमुळे पुस्तकांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. तरीही शासनातर्फे यावर दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु तरीही दरवर्षी मुलांना नवीन पुस्तकांचे वाटप केले जात असल्याने वर्ष संपल्यानंतर ही पुस्तके रद्दीत जाऊ लागली आहेत. यामुळे आज प्रत्येक शाळेत रद्दी पुस्तकांचे गोदाम तयार झाले आहेत.
सर्वशिक्षा अभियान सुरू होण्यापूर्वी पर्यावरण संरक्षणालाही गुरुजींकडून धडे दिले जात. यामुळे ही पुस्तके तयार करताना लागणाऱ्या कागदाकरिता किती वृक्षांची कत्तल केली जाते याचा विचारसुद्धा शासनाने करणे गरजेचे आहे. यासोबतच शासकीय कामकाजात कागदाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कदाचित त्यात काही कागद अनावश्यकपणेही वापरले जातात. शासकीय कार्यालयात विशेषतः शाळेत एकच एक माहिती वर्षातून अनेकदा कागदावर मागविण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदाचा उपयोग केला जातो.
आज बहुतांश पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे असलेला कल लक्षात घेता सर्वसामान्य पालकांना पुस्तकांच्या माध्यमातून लुटण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. यामुळे पालक आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षणकरिता लागणारी पुस्तके वाटेल तितके पैसे खर्च करून दुकानातून खरेदी करून देत असत. तर सर्वसामान्य गरीब पालक वरच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांची पुस्तके अर्ध्या किमतीत किंवा पाव किंमतीत घेऊन त्यांची योग्य दुरुस्ती करून वर्षभर त्या पुस्तकाचा वापर करीत असत. परंतु अलीकडे ही पद्धत बंद झाली आहे.
तर विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तके मिळत असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा पुस्तकांची पाहिजे तशी काळजी घेताना दिसत नाही. बऱ्याच शाळांमध्ये पायमोज्यापासून तर पुस्तके खरेदी करण्यापर्यंत सर्व शाळेकडून खरेदी करण्याची सक्ती केली जाते. या व्यवहारामध्ये शाळा संचालकांना चांगले कमिशन मिळत असल्याची चर्चा आहे. आज ऑनलाईन पद्धतीने जरी शिक्षण सुरू असले तरी काही इंग्रजी माध्यमाचा शाळा विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश घालून ऑनलाईन शिक्षण घेण्यास भाग पाडत आहेत. विशेष म्हणजे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर शिक्षण विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही.