स्कूल बसचालकांची उपासमार, वाहने पडली अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:39+5:302021-06-06T04:10:39+5:30
वरूड : विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांनी कर्ज काढून स्कूल व्हॅन, बस खरेदी केल्या. परंतु, कोरोनाकाळात शाळा, महाविद्यालये ...
वरूड : विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांनी कर्ज काढून स्कूल व्हॅन, बस खरेदी केल्या. परंतु, कोरोनाकाळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. परिणामी स्कूल व्हॅन, बस उभ्या आहेत. त्यामुळे आर्थिक आवक थांबल्याने कर्जाचा डोंगर वाहतूकदारांवर वाढला आहे. १५ महिन्यांपासून व्यवसाय बंद पडल्याने कर्जाचे हप्ते कसे भरावे, हा प्रश्न असून बँक, फायनान्स कंपनी वसुलीचा तगादा लावत आहेत. परिणामी विद्यार्थी वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तालुक्यात खेडपाड्यांतील हजारो विद्यार्थी वरूड शहरात शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची ने-आण स्कूल व्हॅन, बस बँक फायनान्स कंपन्यांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन खरेदी केले गेले. कोरोनाकाळात शाळा-महाविद्यालये बंद झाली. आता सर्व सुरळीत सुरू असताना केवळ शाळा-महाविद्यालयेच बंद आहेत. मार्च २०२० पासून विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय ठप्प आहे. यामुळे स्कूल व्हॅन, बसचालक-मालकावर आर्थिक संकट कोसळल्याने उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, फायनान्स कंपन्यांकडून वाहन जप्तीची कारवाई सुरू आहे. यामुळे मानसिक त्रास वाढला असून, यातून अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोठी किंमत देऊन घेतलेली वाहने अल्प किमतीत जाण्याऐवजी परिवहन विभागाने प्रवासी वाहतुकीची परवानगी द्यावी तसेच शासनाने कर्जाचे व्याज माफ करावे, काही अनुदान देऊन मदत करावी, अशी मागणी स्कूल व्हॅन, बसचालक-मालक संघटनेने केली आहे.
शासनाने करावी आर्थिक मदत
आम्ही सुशिक्षित बेरोजगार असल्याने विद्यार्थी वाहतुकीकरिता लाखो रुपये कर्ज घेऊन स्कूल व्हॅन, बस खरेदी केल्या. मात्र, कोरोनाकाळात चाके थांबल्याने अर्थचक्र ठप्प झाले आहे. कर्जाचा डोंगर वाढला आहे. बँका, फायनान्स कंपन्यांच्या वसुलीचा तगादा, तर सिबिल खराब होत आहे. यामुळे आमची उपासमार होत आहे. कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने आर्थिक मदत करावी तसेच परिवहन विभागाने प्रवासी वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी विद्यार्थी वाहतूक चालक-मालक संघटनेशी संबंधित व्हॅनचालकांनी केली आहे.