दिघी जहानपूर येथे शाळेत मटन पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:09 PM2019-01-02T22:09:22+5:302019-01-02T22:10:04+5:30
तालुक्यातील दिघी जहानपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी मटन पार्टीचा बेत आखून ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष केला. हा प्रकार लक्षात येताच पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे तक्रार दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : तालुक्यातील दिघी जहानपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी मटन पार्टीचा बेत आखून ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष केला. हा प्रकार लक्षात येताच पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे तक्रार दाखल केली आहे.
दिघी येथील शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. दोन शिक्षकांची नेमणूक येथे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पहिली ते पाचवीपर्यंत येथे फक्त सहाच विद्यार्थी शिक्षण घेतात. ३१ डिसेंबर रोजी शाळेचे मुख्याध्यापक अनिल मोहोळ व सहायक शिक्षक प्रेमदास गेठे यांनी शाळेत मटण सेवन केले आणि नंतर जेवणाची भांडी विद्यार्थ्यांना धुण्यास सांगितली. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षकांचे जेवण व मद्यधुंद अवस्थेत असल्याची छबी कॅमेऱ्यांत कैद केली आणि पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी सुधीर अरबट व शिक्षणाधिकारी प्रशांत घाटे यांना हकिगत सांगितली. शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी संतप्त पालकांनी निवेदनातून केली. यावेळी रणजित बुधाळे, नीलेश डोंगरे, दीपक डोंगरे, पेठ जहानपूर येथील पोलीस पाटील मिलिंद सिरस्कार, प्रशांत सगणे, दिघी येथील पोलीस पाटील प्रमोद शिरसाट, संदीप नितनवरे, गजानन सगणे उपस्थित होते.
मुख्याध्यापकांची कबुली
सदर प्रकरणाची माहिती होताच, शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट, विधानसभा प्रमुख रवि कोरडे, उपतालुकाप्रमुख गणेश ठाकरे, संदीप अरबट हे जिल्हा परिषद शाळेत धडकले. मुख्याध्यापकांनी शाळेत सामिष भोजन केल्याचे कबूल केले व सर्व पालकांची माफी मागितली. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर प्रकरणाची तक्रार माझ्याकडे प्राप्त झाले आहे. गावातील काही नागरिक राजकारण करीत असल्याचे यावरून निदर्शनास आले. ५ जानेवारीनंतर प्रत्यक्ष चौकशी करून सदर अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल.
- प्रशांत घाटे, गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, दर्यापूर
शाळेतच मटण शिजविल्याचा प्रकार निंदनीय आहे. सदर प्रकरणासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे. ज्या शिक्षकांनी असे कृत्य केले त्यांची त्वरित चौकशी केली करून दोषी शिक्षकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
- गजानन देवतळे, सभापती, पंचायत समिती, दर्यापूर