शिक्षण संचालकस्तरावर शाळा फायलींच्या तपासणीचा फार्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 05:36 PM2018-10-28T17:36:51+5:302018-10-28T17:38:18+5:30
कायम अनुदानित शाळांमधील 'कायम' हा शब्द निघाल्यानंतर बिनपगारी शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्षांपासून वेतन मिळण्याचा मार्ग सुकर झाला.
अमरावती - कायम अनुदानित शाळांमधील 'कायम' हा शब्द निघाल्यानंतर बिनपगारी शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्षांपासून वेतन मिळण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या फाईलींची मायक्रो तपासणी केल्यानंतरही पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालय स्तरावर शाळा फायलींच्या तपासणीचा फार्स सुरू आहे. परिणामी पात्र शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार नसून यंदाही या शिक्षकांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र आहे.
शासन निर्णयानुसार २० टक्के अनुदानित आणि १ व २ जुलै रोजीच्या घोषित झालेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यात आला. मात्र, वेतनाच्या फायली शिक्षण संचालक कार्यालयात प्रलंबित असल्याने बिनपगारी शिक्षकांना शासन निर्णयानंतरही दिवाळी वेतन मिळणार नाही. जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी फायली तपासूनच त्या शिक्षण संचालकांकडे पाठविला असताना पुन्हा फेरतपासणीच्या नावे शिक्षकांप्रती अडवणुकीचे धोरण सुरू असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शिक्षण महासंघाचे शेखर भोयर यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना शिक्षकांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी पत्रव्यवहार चालविला आहे. शासनाने शाळांसाठी अनुदान देण्यासंदर्भात टक्केवारी जाहीर केली. परंतु, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता नियमित वेतन मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तथापि, शिक्षकांच्या वेतनाच्या फाईलींचा प्रवास शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांकडून पुणे येथे शिक्षण संचालकांकडे पाठविला गेला. दिवाळीपूर्वी या शिक्षकांना वेतन मिळणे अपेक्षित होते. मात्र, शिक्षण संचालक कार्यालयात फाईलींच्या फेरतपासणीच्या नावाने शिक्षकांची अडवणूक केली जात आहे. फाईलींची तपासणी सूची तयार करण्यात येत असून, त्रुटी काढण्याचा प्रकार सुरू झाला आहे. अगोदर अनेक वर्षे ‘कायम’ विनाअनुदानित शाळांवर सेवा देत असताना शासन निर्णयानंतरही या शिक्षकांच्या पदरी निराशाच आली आहे.
आठ हजार शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा
खासगी शाळा तसेच वर्ग शिक्षक असे मिळून राज्यात सुमारे आठ हजार शिक्षकांना नव्या शासन निर्णयानुसार वेतन मिळणार आहे. अगोदर अनेक वर्षे बिनपगारी पवित्र शिक्षण क्षेत्रात सेवा दिल्यानंतरही आतातरी शासन निर्णयानंतर नियमित वेतन मिळेल, ही अपेक्षा शिक्षकांना होती. मात्र, यंदा या शिक्षकांना वेतनाअभावी दिवाळी आनंदात विरजण येणार आहे, हे विशेष.
शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी संबंधित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या वेतनाबाबतच्या फाईलींचे बारकाईने तपासणी केली. असे असताना आता पुणे येथे शिक्षण संचालक कार्यालयस्तरावर फेरतपासणीचा फार्स कशासाठी हा देखील संशोधनाचा विषय आहे.
- शेखर भोयर, अध्यक्ष, शिक्षक महासंघ
राज्यातील शाळांच्या फाईली प्राप्त झाल्या आहे. शिक्षकांचे वेतनबाबतची तपासणी सुरू आहे. त्वरेने कार्यवाही पूर्ण करून पात्र शिक्षकांना वेतन दिले जाईल.
- गंगाधर मम्हाने, संचालक, शिक्षण विभाग, पुणे