शाळेने ५० टक्के फीसाठी पाठविले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:21 PM2019-01-01T22:21:58+5:302019-01-01T22:22:13+5:30
वर्षारंभीच शहरातील सिकची कॉन्व्हेंटने विद्यार्थ्यांना ५० टक्के फी भरण्याचे बजावत घराकडे रवाना केले. नव्या वर्षाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, या चिमुकल्यांना वर्षाची सुरुवात दु:खद अनुभव देऊन गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : वर्षारंभीच शहरातील सिकची कॉन्व्हेंटने विद्यार्थ्यांना ५० टक्के फी भरण्याचे बजावत घराकडे रवाना केले. नव्या वर्षाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, या चिमुकल्यांना वर्षाची सुरुवात दु:खद अनुभव देऊन गेली आहे.
नवीन वर्षाला शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा गिफ्ट वस्तू देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते व त्यांना नवीन वर्ष सुखाचे जावो, यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. मात्र, तसे न होता चिमुकले विद्यार्थी हे शाळेमध्ये पोहोचताच त्यांना शैक्षणिक फी न भरल्यामुळे गेटच्या बाहेरूनच घरी पाठवून दिले गेले. सदरची बाब पालकांच्या लक्षात येताच त्यांनी शाळेमध्ये धाव घेतली. मात्र, तिथे कुणीही उपस्थित नव्हते. यानंतर पालकांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मुख्याध्यापक दीपाली टाले यांनी हजर होत, आम्हाला वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करायचे आहे, असे सांगितले. या प्रकाराने नवीन वर्षाला विविध वस्त्र परिधान करून शाळेत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र हिरमोड झाला.
संस्थेच्या अध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मुद्द्यावर चर्चेतून तोडगा काढता आला असता, अशा प्रतिक्रिया काही संतप्त नागरिकांनी याप्रसंगी मुख्याध्यापक टाले यांच्याकडे व्यक्त केल्या.
दुपारचे सत्र ठेवले बंद
काही पालक हे शिक्षकांशी वादविवाद करीत होते. त्यामुळे प्रकरण आपल्यावर शेकणार, हे लक्षात येताच शिक्षकांनी नोटीस बोर्डवर सूचना लिहून दुपारची शाळा बंद ठेवत असल्याचे नमूद करून सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवून दिले. विद्यार्थ्यांनी सोबत आणलेला जेवणाचा डबा हा शाळेच्या बाहेरच खाऊन घेतला. हे दृश्य पाहून पालकांंनी पुन्हा शाळेच्या आवारात गर्दी केली .
शिवसेनेचा इशारा
शिवसेना पदाधिकाºयांना ही बाब लक्षात येताच त्यांनी शाळेमध्ये जाऊन सदर शिक्षकांशी चर्चा केली. यावेळी गटशिक्षणाधिकाºयांना बोलावून घेण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षांवर कारवाई करा, अन्यथा आम्ही शाळा बंद पाडू, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट तसेच रवि कोरडे, सतीश साखरे आदी पालकांनी दिली. यावेळी गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांनासुद्धा बोलावण्यात आले होते.
दरम्यान, गटशिक्षणाधिकाºयांनी विचारणा केली असता, जोपर्यंत पालक फी भरत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही, या भूमिकेवर संस्थाध्यक्ष ठाम होते.
आम्ही नवीन वर्षदिनी विद्यार्थ्यांना अतिशय उत्साहाने शाळेमध्ये पाठविले होते. मात्र, शिक्षकांनी शैक्षणिक फी न भरल्यामुळे त्यांना घरी परत पाठवून दिले. या घटनेने विद्यार्थ्यांच्या मनावर आघात झाला आहे. याला जबाबदार कोण, याचे उत्तर मिळाले पाहिजे.
- राजेश श्रीराव
पालक
वारंवार सूचना देऊनही पालक शैक्षणिक शुल्काचा भरणा करीत नाहीत. नियमांची पायमल्ली होत असल्याने आज आम्हाला नाइलाजाने हे पाऊल उचलावे लागले. पालकांना दोन दिवसांची मुदत देत आहोत.
- अविनाश गायगोले
अध्यक्ष, शाळा समिती
संस्थेच्या अध्यक्षांशी दूरध्वनीद्वारे माहिती घेतली असता, त्यांना पालकसभा बोलावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यांनी पालकसभा बोलावणार नाही व जोपर्यंत पालक पैसे भरत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश नाही, असे उद्धट भाषेत माझ्याशी बोलणे केले. सदर संस्थेवर पत्रव्यवहार करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- प्रकाश घाटे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, दर्यापूर