खोजनपूरची शाळा भरली दुर्गादेवी मंदिरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:52 PM2019-07-02T22:52:55+5:302019-07-02T22:53:25+5:30
अचलपूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची दैनावस्था विद्यार्थीच नव्हे, शिक्षकांसाठीही तापदायक झाली आहे. दोन वर्षांपासून खोजनपूर येथे शाळा इमारतच नसल्याने गावातील दुर्गादेवी मंदिरात भरत आहे, तर खैरी आणि इंदिरानगर येथील शाळा समाजमंदिरात सुरू आहेत. तालुक्यात अनेक शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून, नवीन वर्गखोल्यांची मागणी करूनही जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष पालकांमध्ये संताप निर्माण करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची दैनावस्था विद्यार्थीच नव्हे, शिक्षकांसाठीही तापदायक झाली आहे. दोन वर्षांपासून खोजनपूर येथे शाळा इमारतच नसल्याने गावातील दुर्गादेवी मंदिरात भरत आहे, तर खैरी आणि इंदिरानगर येथील शाळा समाजमंदिरात सुरू आहेत. तालुक्यात अनेक शाळांच्या वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून, नवीन वर्गखोल्यांची मागणी करूनही जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष पालकांमध्ये संताप निर्माण करीत आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत अचलपूर तालुक्यात १२९ शाळा, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत ११ हजार विद्यार्थी आणि ५२० वर्गखोल्यांची नोंद आहे. प्रत्यक्ष अनेक शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्त, पडक्या असून, नवीन वर्गखोल्यांची मागणी वारंवार करूनही जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारे ठरले आहे. मुकींदपूर, इसापूर, वाढोणा, इसेगाव, तुळजापूर जहागीर, देवरी, शिंदी बुद्रुक, खांबोरा, गोंडवाघोली, मेघनाथपूर, गोंडविहीर, बुरडघाट, पिंपळखुटा आदी गावांतील नादुरुस्त वर्गखोल्यांचे प्रस्ताव पाठविले; मात्र २६ जून रोजी शाळांची घंटा वाजूनही कुणाचेही लक्ष या बाबीकडे गेलेच नाही. गटशिक्षणाधिकारी कार्यालयानेही पाठपुरावा केलेला नाही.
नवीन शाळा, वर्गखोल्या फाईलबंद
खोजनपूर, खैरी, इंदिरानगर येथे नवीन इमारत आणि नारायणपूर, पायविहीर, भिलखेडा, खांजमानगर, येसूर्णा, नरसिंगपूर, जनोना येथे नवीन वर्गखोल्यांची मागणी आहे. अचलपूर पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे या प्रकरणाची फाइल दोन वर्षांपासून पडून आहे.
मंदिर आणि शाळेची घंटा सोबतच
खोजनपूर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत दोन वर्षांपूर्वी पाडण्यात आली. आता गावात नवीन शाळा इमारत होईल, ही नागरिकांची अपेक्षा फोल ठरली. मागील दोन वर्षांपासून गावातील शाळा दुर्गादेवी मंदिरात भरते. मंदिर आणि शाळेची घंटा सोबतच वाजते.
पहिली ते पाचवीपर्यंत विद्यार्थी एकत्र
खोजनपूर, खैरी, इंदिरानगर येथील शाळा मंदिर आणि समाजमंदिरात भरत असल्याने सर्व वर्ग एकत्र बसविण्यात येत आहे. खोजनपूर येथे पहिली ते पाचवीपर्यंत १७ विद्यार्थी आहेत. शाळा इमारत नसल्याने विद्यार्थिसंख्याही मोठ्या प्रमाणात रोडावली आहे.
तालुक्यात काही शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्त आहे. नवीन शाळा इमारती आणि वर्गखोल्यांची मागणी करण्यात आली आहे. शाळा बंद न ठेवता त्या तीन ठिकाणी समाजमंदिर व मंदिरात सुरू आहेत.
- रूपराव सावरकर, गटशिक्षणाधिकारी, अचलपूर