चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणात स्कूल व्हॅनचालकाला पहाटे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:22 PM2018-11-20T22:22:11+5:302018-11-20T22:23:10+5:30
आ. सुनील देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ साडेतीन वर्षीय चिमुकलीला धडक देणाऱ्या स्कूल व्हॅनच्या चालकाला पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आ. सुनील देशमुख यांच्या निवासस्थानाजवळ साडेतीन वर्षीय चिमुकलीला धडक देणाऱ्या स्कूल व्हॅनच्या चालकाला पोलिसांनी मंगळवारी पहाटे अटक केली.
गोपालसिंग गौतम (६०, रा.रहाटगाव) असे आरोपी चालकाचे नाव आहे. पोलिसांनी एमएच-२७ ए ९७३९ या क्रमांकाची सेन्ट फ्रान्सिस इंग्लिश स्कूलची व्हॅन जप्त केली आहे.
स्पीच थेरपीसाठी मयूरी कुळकर्णी यांच्या केंद्रावर आलेली आज्ञा प्रफुल्ल मंडळकर (रा. जळका शहापूर) या चिमुकलीला सोमवारी सायंकाळी एमएच २७ ए ९७३९ क्रमाकांच्या स्कूल व्हॅनने धडक दिली. घटनस्थळ आ. सुनील देशमुख यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे. अपघातानंतर गंभीर जखमी आज्ञाचा लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. एकुलत्या एक आज्ञाचा मृत्यू झाल्यामुळे मंडळकर कुटुंबीय शोकसागरात बुडाले. दरम्यान, अपघात घडविल्यानंतर चालक स्कूल व्हॅन घेऊन पसार झाला. पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर व शिपाई नितीन गावंडे आरोपी चालक गोपालसिंग गौतमचा शोध घेत होते. तो मंगळवारी पहाटे पोलिसांच्या हाती लागला. त्याला ठाण्यात आणून चौकशी केली असता, कठोरा नाका येथून बसस्थानक मार्गे तो रुक्मिणीनगर येथे शिकवणी वर्गातील मुले सोडण्यासाठी जात होता. यादरम्यान हा अपघात घडल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिली आहे. आरोपी गोपालसिंगला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी झाली आहे.
अपघात प्रकरणातील स्कूल व्हॅनचालकास अटक करण्यात आली. व्हॅनसुद्धा जप्त केली आहे. पुढील चौकशी तपास अधिकारी करीत आहेत.
- शशिकांत सातव
पोलीस उपायुक्त