अत्याचारग्रस्त विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारला
By admin | Published: October 18, 2014 12:46 AM2014-10-18T00:46:11+5:302014-10-18T00:46:11+5:30
अत्याचारग्रस्त पीडित विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.
अमरावती : अत्याचारग्रस्त पीडित विद्यार्थिनीला शाळेत प्रवेश नाकारल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्याकरिता पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी मुख्याध्यापक व शिक्षिकेला बोलावून त्यांचे बयाण नोंदविले आहे.
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग झाला होता. याची तक्रार १७ जुलै २०१४ रोजी फ्रेजरपुरा पोलिसांनी दाखल करुन आरोपी सिध्दार्थ उत्तम गणवीरविरुध्द भादंविच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. अत्याचारानंतर पीडिता गर्भवती झाली.
न्यायालयासमोर आरोपीला प्रस्तुत केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती. मात्र, या घटनेनंतर पीडितेला प्रचंड यातनादायक प्रसंगांचा सामना करावा लागत होता.पीडितेला शाळेत प्रवेश नाकारल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना कळताच त्यांनी पीडिता व तिच्या आईसोबत चर्चा केली. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीला दुर्देवी घटनेनंतर शाळेत येण्यास मज्जाव केल्याचे मुलीने व तिच्या आईने घार्गे यांना सांगितले. अत्याचारग्रस्त मुलीसोबत अमानवीय व्यवहार करणाऱ्या मुख्याध्यापिकेला शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता पाचारण करून उपायुक्तांनी त्यांच्या समवेत चर्चा केली. तसेच त्यांचे बयाण नोंदविले. पीडित मुलीचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेऊन नये, तसेच तिला आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवावे आणि सन्मानजनक वागणूक द्यावी, अशा सूचना पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी मुख्याध्यापिकेला दिल्या आहेत. अत्याचार झालेल्या मुलीच्या वेदना कमी करण्यासाठी शाळा प्रशासनानेसुध्दा प्रयत्न करावेत, असेही घार्गे यांनी सांगितले.