अमरावती जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस ३० पर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 09:35 PM2020-09-02T21:35:50+5:302020-09-02T21:36:10+5:30
अमरावती जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३० सप्टेंबरपर्यत बंद राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३० सप्टेंबरपर्यत बंद राहणार आहेत. मार्केट रात्री ९ पर्यंत सुरू राहील. हॉटेल, लॉज पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. दारू, पान, तंबाखू, तंबाखजन्य पदार्थांच्या विक्रीला परवानगी देण्यात आली; तथापि सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या वापरास मनाई करण्यात आलेली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केला.
‘मिशन बिगेन अगेन’अंर्तगत नव्याने संचारबंदीचे आदेश जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यत राहणार आहे. यामध्ये सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य आहे. सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. सार्वजनीक ठिकाणी दोन व्यक्तींमधील अंतर कमीत कमी सहा फुटांचे असावे. दुकानातदेखील दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राहील, याची दक्षता घ्यायला हवी. एकाच वेळी पाचपेक्षा जास्त लोक एकत्रित येणार नाहीत, याचीदेखील दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आलेली आहे, असे आढळल्यास नियमानुसार दंडात्मक व फौजदारी कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
या कालावधीत अधिकाधिक लोकांना घरून काम करण्याची मुभा देण्यात यावी. याशिवाय दुकाने, औद्योगिक क्षेत्र, वाणिज्यिक आस्थापना यांनी त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित कराव्यात. या सर्व ठिकाणी थर्मल स्कॅनिंग , हॅन्डवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था करावी. कामगारांमध्ये सुरक्षित अंतर, दोन शिफ्टमध्ये अंतर व दुपारच्या वेळी जेवनांच्या वेळांमध्ये अंतर असावे, असे निर्देश आहेत. सर्व शासकीय कार्यालयातील अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी पूर्ण क्षमतेने उपस्थित राहतील. याशिवाय वर्ग ‘अ’ व ‘ब’ श्रेणीमधील कर्मचारी पूर्णक्षमतेसह उपस्थित राहतील. महापालिका क्षेत्रात ३० टक्के, इतर क्षेत्रातील कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील. ६५ वर्षांवरील वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, १० वर्षावरील मुले यांनी अत्यावश्यक व वैद्यकीय सेवा वगळता घराबाहेर पडू नये, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
प्रत्येक कार्यालयात दक्षता अधिकारी
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी याची दक्षता घेण्यासाठी दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश आहेत. कर्मचाऱ्यांना मास्क उपलब्ध करुन देण्यात यावे. अन्य सुविधा उपलब्ध कराव्यात. खासगी कार्यालयात ३० टक्के आस्थापनेसह सुरू ठेवता येतील. कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे व दक्षता अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अे आदेशात नमूद आहे.