मेळघाटातील शाळांना मिळणार स्थानिक शिक्षक; जिल्हा परिषदेच्या पाठपुराव्याला यश
By जितेंद्र दखने | Published: October 5, 2023 05:40 PM2023-10-05T17:40:53+5:302023-10-05T17:45:21+5:30
नागरिकांच्या मागणीला यश : २४७ उमेदवारांच्या नावाची यादी प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त
अमरावती : अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील (मेळघाट) - शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक शिक्षक पदासाठीची अर्हता धारण केलेले व पात्र असलेले युवकांना शाळांमधील रिक्त असलेल्या पदावर नियुक्त केली जाणार आहेत. २०२२-२३ च्या आधारावर संचमान्यता प्राप्त असून त्या नुसार ही पदभरतीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याने अनेक ठिकाणच्या पालकांनी आंदोलन करून नवीन शिक्षकांची सातत्याने मागणी केली जात आहे. अशातच मेळघाट या अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील - शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाच्या मान्यतेने रिक्त पदांच्या ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी मिळाली आहे.
मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यात शिक्षकांची पेसा क्षेत्रातील बिंदूनामावली नुसार सुमारे ३१३ शिक्षकांची पदे आजरोजी रिक्त आहेत. या रिक्त पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त स्थानिक उमेदवारांची मेळघाटातील पेसा क्षेत्रातील पदभरतीला शासनाने परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त यांनी जिल्हा परिषदेस दिले आहेत. याकरीता २४७ उमेदवारांच्या नावाची यादी प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे.
या उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्राची पडताळणी शिक्षण विभागा मार्फत केली जात आहे. यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पात्र ठरणाऱ्या शिक्षकांना आदिवासी भागातील शाळेवर रिक्त असलेल्या जागेवर नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही नियुक्ती देताना स्थानिक उमेदवारांनाच शिक्षक पदाची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता मेळघाटातील ३१३ रिक्त जागेपैकी किती शिक्षकांची नियुक्त होते. याबाबतचे चित्र भरती प्रक्रियेच्या नंतरच स्पष्ट होणार आहे.
मेळघाटातील शाळांना प्रथम प्राधान्य
शासनाच्या सूचनेप्रमाणे शिक्षकांच्या रिक्त पदांपैकी ८० टक्के जागाच भरण्याचे निर्देश आहेत. ही पदे भरताना सर्व प्रथम दुर्गम भागातील शून्य शिक्षकी शाळा, त्यानंतर एक शिक्षकी व कमी शिक्षक असलेल्या शाळा असे प्राधान्यानुसार शिक्षक भरती केली जाणार आहे. तसेच सर्व शिक्षक हे स्थानिक असल्याने पुढे जिल्हा बदलीमुळे जागा रिक्त होणार नाहीत, हे विशेष.