शाळांची आता अचानक होणार झाडाझडती
By admin | Published: December 2, 2015 12:17 AM2015-12-02T00:17:58+5:302015-12-02T00:17:58+5:30
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी मुख्याध्यापकांना दिलेली ३० नोव्हेंबरची मुदत सोमवारी संपली.
दफ्तराच्या ओझ्याची मुदत संपली : वरिष्ठ अधिकारी कधीही धडकणार
अमरावती : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी मुख्याध्यापकांना दिलेली ३० नोव्हेंबरची मुदत सोमवारी संपली. कोणत्या शाळेतील विद्यार्थ्यांचे ओझे खरोखरच कमी झाले आहे, याची आता शिक्षण विभागाच्यावतीने तपासणी केली जाणार आहे. शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी या तपासणीसाठी शाळांना भेटी देऊन दफ्तरांचे वजन तपासणार आहेत.
दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारने आदेश दिले होते. त्यानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत ओझे कमी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. दिलेल्या मुदतीत ओझे कमी न झाल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार असल्याचे राज्य शासनाने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचे अधिकारी आता शाळांमध्ये जाऊन दफ्तरांच्या वजनाची तपासणी करणार आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सर्व शाळांना ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते. मात्र शाळांकडून असे अहवाल शिक्षण विभागाला मिळालेले नाही. शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी दर्जाचे अधिकारी स्वत: शाळांची अचानक तपासणी करणार आहेत. ज्या शाळेत दफ्तराचे ओझे ठरविलेल्या वजनापेक्षा जास्त आहेत. तेथील मुख्याध्यापकांना याप्रकरणी जबाबदार धरले जाणार आहे. लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)