'सायंटिफिक पार्क'मुळे अमरावतीच्या वैभवात भर पडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:59+5:302021-06-29T04:09:59+5:30

पालकमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी, सायन्स कोअरवर तारांगणही साकारणार अमरावती : विद्यार्थी व नागरिकांमध्ये विज्ञानविषयक जाणीव व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित ...

The 'Scientific Park' will add to the splendor of Amravati | 'सायंटिफिक पार्क'मुळे अमरावतीच्या वैभवात भर पडेल

'सायंटिफिक पार्क'मुळे अमरावतीच्या वैभवात भर पडेल

Next

पालकमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी, सायन्स कोअरवर तारांगणही साकारणार

अमरावती : विद्यार्थी व नागरिकांमध्ये विज्ञानविषयक जाणीव व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने शहरातील मध्यवर्ती सायन्स कोअर मैदानाचे रूपांतर आता सायंटिफिक पार्कमध्ये होत आहे. हा उपक्रम ‘एज्युकेशन हब’ असलेल्या अमरावतीच्या वैभवात भर घालणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

येथील सायन्सकोर मैदानावर सायंटिफिक पार्कचे भूमिपूजन करताना ना. ठाकूर बोलत होत्या. ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे १३ रुग्णवाहिकांचे लोकार्पणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. मैदानावर निर्माण करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅक व इतर सुविधांची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली.

माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, महापौर चेतन गावंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा आदी उपस्थित होते.

----------------

सायन्स कोअरवर साकारणार तारांगण

सायंटिफिक पार्कमध्ये प्लॅनेटोरियमची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तारांगणाची शास्त्रीय माहितीसह अनुभूती अमरावतीकरांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे विज्ञानविषयक प्रदर्शनाचाही पार्कमध्ये समावेश आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये निधीतून हा सुंदर प्रकल्प उभा राहणार आहे. सायंटिफिक पार्कच्या रूपाने एक महत्त्वाचा प्रकल्प शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारत आहे. त्याची नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

------------------

सायन्स कोअर मैदानावर जॉगिंग ट्रॅकची पाहणी

सायन्स कोअर मैदानावर संरक्षण व सौंदर्यीकरण अंतर्गत १ कोटी ५२ लाख रुपये निधीतून मैदानाचे गेट, कुंपणभिंत, ४०० मीटर पेव्हरचे जॉगिंग ट्रॅक बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी वृक्षारोपण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी केली व खेळाडू तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Web Title: The 'Scientific Park' will add to the splendor of Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.