शेतकरीपुत्र ते डीआरडीओचा शास्त्रज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:31 PM2019-04-16T22:31:41+5:302019-04-16T22:31:56+5:30
अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथील शेतकरीपुत्र आतिष तायडे याने उंच भरारी घेतली आहे. देशभरात शास्त्रज्ञ घडविणारी संस्था म्हणून नावलौकीक असणाऱ्या रक्षा अनुसंधान व विकास संघटना ‘डीआरडीओ’ हैद्राबाद येथे शास्त्रज्ञ म्हणून त्याची निवड झाली आहे.
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथील शेतकरीपुत्र आतिष तायडे याने उंच भरारी घेतली आहे. देशभरात शास्त्रज्ञ घडविणारी संस्था म्हणून नावलौकीक असणाऱ्या रक्षा अनुसंधान व विकास संघटना ‘डीआरडीओ’ हैद्राबाद येथे शास्त्रज्ञ म्हणून त्याची निवड झाली आहे.
मल्हारा येथील साहेबराव तायडे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे ते मजुरीही करतात. त्यांचा मुलगा आतिष याने मल्हारा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतच दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीत चांगले गूण मिळाल्यानंतर त्याने गौरखेडा येथील लुल्ला विद्यालयातून बारावी उत्तीर्ण केली. आतिषला वडीलांच्या आर्थिक परिस्थितीची जाण होती. त्यामुळे त्याने बारावीत चांगले गुण प्राप्त केले. त्यामुळे त्याला अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तेथून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. नोकरीस प्राधान्य न देता आणखी उच्च शिक्षण घेण्याकरिता दिल्ली गाठली. दिल्लीत त्याने भारतीय अभियांत्रिकी सेवा (आईएस) ची तयारी केली. त्यानंतर गेट (जीएटीई) च्या माध्यमातून त्याची आयआयटीसाठी दिल्लीसाठी निवड झाली. आयआयटीमध्ये त्याने शिक्षण घेतले. मात्र, यादरम्यानच त्याची डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आतिषला त्याचे काका दादाराव तायडे यांनी आर्थिक मदत केली. दहावीपर्यंत मल्हारासारख्या खेड्यातील मराठी शाळेत शिक्षण घेवून आतिष केवळ अपार मेहनत व जिद्दीच्या बळावर शास्त्रज्ञ झाला आहे. त्याच्या या यशाची पंचक्रोशीत चर्चा आहे.