स्क्रब टायफसचे अर्धशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:20 PM2018-09-15T22:20:19+5:302018-09-15T22:20:54+5:30

‘चिगर माईट्स’ या सूक्षम कीटकापासून माणसात संसर्गित होणाऱ्या स्क्रब टायफसने जिल्ह्यात पन्नाशी गाठली आहे. खासगी रुग्णालयात दाखल संशयित आणि निश्चित निदान झालेल्यांची संख्या तब्बल ५० वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील तिघांसह वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील एका रुग्णाचा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Scratch Typhus Half-Century | स्क्रब टायफसचे अर्धशतक

स्क्रब टायफसचे अर्धशतक

Next
ठळक मुद्देआरोग्य विभाग ढिम्म : वर्धेचे तीन रुग्ण खासगी रु ग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘चिगर माईट्स’ या सूक्षम कीटकापासून माणसात संसर्गित होणाऱ्या स्क्रब टायफसने जिल्ह्यात पन्नाशी गाठली आहे. खासगी रुग्णालयात दाखल संशयित आणि निश्चित निदान झालेल्यांची संख्या तब्बल ५० वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील तिघांसह वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील एका रुग्णाचा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या चौघांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
१४ सप्टेंबर रोजी आरोग्य यंत्रणेने खासगी रुग्णालयात दाखल १२ संशयित स्क्रब टायफस रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी नागपूर जीएमसीकडे पाठविले आहेत. १२ पैकी तीन रुग्ण वर्धा जिल्ह्यातील आष्टी, धाडी व नांदोरा येथील आहेत. दोन महिला व एक पुरुष असे हे तीन रुग्ण डॉ. संदीप मलिये व डॉ. मुस्तफा साबिर यांच्याकडे दाखल आहेत. तीन रुग्ण नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आहेत. उर्वरित ९ रुग्णांमध्ये मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथील ४६ वर्षीय पुरुष, नांदगाव खंडेश्वर येथील एक महिला, टाकळी येथील ६५ वर्षीय महिला, चंडिकापूर येथील ५० वर्षीय गृहस्थ, रामा साऊर येथील ७० वर्षीय वृद्ध, घारफळ येथील ५० वर्षीय महिला, पाळा येथील ३२ वर्षीय महिला, दर्यापूर तालुक्यातील मिर्झापूर येथील एक ४२ वर्षीय महिला व चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथील एका १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. हे रुग्ण डॉ. मनोज निचत, डॉ. मुस्तफा साबिर, डॉ. विजय बख्तार, डॉ.राजेंद्र ढोरे व डॉ. संदीप दानखेडे यांच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्क्रब टायफसच्या उद्रेकाचे अन्वेषण करण्यासाठी संबंधित समिती जिल्ह्यात फिरकली नाही.
कुठे गेले आदेश?
स्वाईनफ्लू या आजारानंतर स्क्रब टायफस आजाराने विदर्भासह मध्यप्रदेशात थैमान घातले आहे. त्याअनुषंगाने राज्य आरोग्य यंत्रणेने सतर्कता बाळगत अमरावती, नागपूर, पुणे, औरंगाबाद परिमंडळातील आरोग्य अधिकाºयांना तातडीने उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शीघ्र ताप सर्व्हेक्षण, कीटकनाशक सर्व्हेक्षण, तणनाशक फवारणी, मॅलेथियॉन पावडरची धुरळणी, ग्रामपंचायतीमार्फत परिसर स्वच्छता आदी बाबी प्राधान्याने करण्याचे निर्देशित केले होते. स्क्रब टायफसचा सर्वाधिक धोका ग्राह्य धरून याची जबाबदारी जिल्हा हिवताप अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे संयुक्तपणे देण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील पाच ते सहा तालुक्यांत या आजाराचे रुग्ण आढळून आल्यानंतर व तिघांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य यंत्रणा ढिम्मच आहे.
स्क्रब टायफसची ही आहेत लक्षणे
बारीक कीटक चावल्याने हा आजार होतो.
दंश केलेल्या ठिकाणी जखम होऊन खिपली येते.
आजाराच्या सुरुवातीला डोकेदुखी व अतिशय थंडी वाजून ताप येतो.
सांधेदुखी व शरीराला थरकाप सुटतो.
उपाय
पूर्ण शरीर झाकल्या जाईल, असे कपडे परिधान करावे.
साफसफाईची दक्षता घ्यावी.
घराच्या आजूबाजूला वाढलेले गवत अतिरिक्त वाढलेले झुडुपी काढून टाकावीत.
फुलांच्या सजावटीवर स्प्रे मारून घ्यावा.
घरात पाळीव प्राण्यांची स्वच्छता ठेवावी.
आजाराच्या सुरुवातीला योग्य निदान झाल्यास स्क्रब टायफस पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो.

Web Title: Scratch Typhus Half-Century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.