स्क्रब टायफसचे आणखी सहा ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:12 AM2018-09-13T01:12:39+5:302018-09-13T01:13:07+5:30
जिल्ह्यात स्क्रब टायफसने आतापर्यंत तीन बळी घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात स्क्रब टायफसचे ३९ रुग्णांमध्ये काही संशयित, तर बहुतांश पॉझिटिव्ह आढळले. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आता पुन्हा स्क्रब टायफसचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात स्क्रब टायफसने आतापर्यंत तीन बळी घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात स्क्रब टायफसचे ३९ रुग्णांमध्ये काही संशयित, तर बहुतांश पॉझिटिव्ह आढळले. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, आता पुन्हा स्क्रब टायफसचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.
सहापैकी चार रुग्ण हे डॉ. मनोज निचत यांच्या राजापेठ येथील श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. एक रुग्ण डॉ. राजेश मुंदे यांच्याकडे, तर एक बोंडे हायटेक क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. बोंडे हॉस्पिटलमध्ये तिवसा तालुक्यातील कुºहा मिर्झापूर येथील एक ३२ वर्षीय महिला चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाली आहे. तिचे रक्तनमुने व खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता, स्क्रब टायफस या आजाराच्या निदानासाठी उपयुक्त असलेली इलायझा चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉ. स्वप्निल शिरभाते यांनी दिली. राजापेठ येथील डॉ. राजेश मुंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये कामरगाव (ता. कारंजा) येथील एक २० वर्षीय युवक चार दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झाला
नांदगाव तालुक्यात तीन रुग्ण
अमरावती : कामरगावच्या रुग्णाचीसुद्धा इलायझा कन्फर्म आहे तसेच डॉ. मनोज निचत यांच्याकडे ३९ पैकी सर्वाधिक १६ रुग्ण ‘स्क्रब टायफस’ या आजाराचे आढळून आले. त्यापैकी एका महिला रुग्ण उपचारादरम्यान दगावली. बुधवारी आणखी चार नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथील ६५ वर्षीय महिला, पाळा येथील ३२ वर्षीय महिला, घारफळ (लोणी) येथील ५० वर्षीय महिला तसेच चंडिकापूर (ता. दर्यापूर) येथील ५० वर्षीय पुरुष रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. निचत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यापूर्वीसुद्धा जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे १३६ अधिक रुग्ण आढळून आल्याचा शासकीय अहवाल आला होता.
खासगी डॉक्टरांकडे अशा रुग्णांची संख्या दहापट अधिक होती. खासगी डॉक्टरांनी डेंग्यूबाबत प्रशासनाला सतर्क केले होते. आता अशी स्थिती स्क्रब टायफस या आजारासंदर्भात सुद्धा निर्माण झाली असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने सावध होणे गरजेचे आहे.
४५ रुग्ण; आरोग्य प्रशासन गप्प का?
जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चे आतापर्यंत ४५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तिघांना जीवसुद्धा गमावावा लागला. मात्र, जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा, जिल्हा शल्यचिकित्सक व महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने हा विषय पाहिजे तेवढा गांभीर्याने घेतला नाही. ज्या भागात ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण आढळून येत आहेत, त्या ठिकाणी फवारणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना शून्य आहेत. लोकांचा जीव धोक्यात असताना आरोग्य यंत्रणा कुंभकर्णी झोपेत का, असा प्रश्न आता पुढे येत आहे.