आदिवासी विकास विभागात सोमवारपासून ‘ऑन स्क्रिन’ बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:11+5:302021-08-01T04:13:11+5:30
अमरावती एटीसींचा पहिला प्रयोग, बदलीपात्र ३६० कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्तांनी कर्मचारी बदल्यांमध्ये ...
अमरावती एटीसींचा पहिला प्रयोग, बदलीपात्र ३६० कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध
अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्तांनी कर्मचारी बदल्यांमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी, यासाठी ‘ऑन स्क्रिन’ बदल्या हा पहिलाच प्रयोग राबविला. सोमवार, २ ऑगस्टपासून सलग तीन दिवस ऑनलाईन बदली करण्यात येणार आहे.
धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी व औरंगाबाद अशा सात एकात्मिक प्रकल्प अधिकारी अधिनस्थ १२ जिल्ह्यातील ‘ट्रायबल’ बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. या बदलीसाठी राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार नागरी सेवा मंडळ अंतर्गत कर्मचारी बदली समिती गठित करण्यात आली आहे. २, ३ व ४ ऑगस्ट असे तीन दिवस बदलीपात्र कर्मचाऱ्यांना ‘ऑन स्क्रिन’ बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरदिवशी १२५ ते १३० कर्मचाऱ्यांना बदलीसाठी बोलावण्यात आले आहे. किंबहुना एखाद्या जागेसाठी वाद निर्माण झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा समुपदेशनातून मार्ग काढणार येणार आहे. दरवर्षी ‘ट्रायबल’मध्ये बदल्या सुरू झाल्या की, राजकीय दबावतंत्र, चिरिमिरी आणि अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविले जातात. मात्र, यंदा ‘ऑन स्क्रिन’ बदल्यांमुळे अनेक कर्मचारी आनंदित असल्याचे चित्र आहे. सोयीच्या ठिकाणी बदली होईल, अशी बहुतांश बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. यंदा शासन निर्णयानुसार कार्यरत पदाच्या २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे. ३ वर्षे प्रशासकीय सेवेचा कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची अगोदरच यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कागदपत्रांची छाननीदेखील आटोपली आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची वैयक्तिक सुनावणी, अडचणी, बदलीचे ठिकाण, अर्ज आणि पर्यायदेखील ठेवण्यात आले आहे. त्यामुळे २ ऑगस्टपासून प्रारंभ होणारी बदली प्रक्रिया नक्कीच तक्रारीविना पार पडेल, असे दिसून येते.
------------------
हे आहेत बदली यादीत
माध्यमिक व प्राथमिकचे शिक्षक, मुख्याध्यापक, कनिष्ठ प्राध्यापक, गृहपाल (महिला, पुरूष) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, आदिवासी विकास अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक, उपलेखापाल, कार्यालय अधीक्षक, उपअधीक्षक अशा एकूण २८ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली यादीत समावेश आहे.
-----------------
यंदा कर्मचारी बदली प्रक्रिया ‘ऑनलाईन’, ‘ऑन स्क्रिन’ पारदर्शक आणि तक्रारीविना राबविली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या साेयीनुसार बदलीचे ठिकाण निश्चित होणार असून, तसे आदेश जारी होतील. समुपदेशाद्धारे बदली करण्यात येणार आहे. मेरीटला प्राधान्य राहील.
-विनोद पाटील, अपर आयुक्त, ‘ट्रायबल’अमरावती.