समुद्री बगळा, लाल पंखांचा चातक अन् लाल छातीची फटाकडी बघायचयं? जरा घराबाहेर पडूया!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 02:30 PM2023-11-01T14:30:09+5:302023-11-01T14:34:25+5:30
अमरावती जिल्ह्यात आले नवे पाहुणे; पहिल्यांदाच महत्त्वपूर्ण नोंदी
मनीष तसरे
अमरावती : ऑक्टोबर या एकाच महिन्यात शहरालगतच्या बोरगाव जलाशय आणि आजूबाजूच्या परिसरात समुद्री बगळा आणि लालसर छातीची फटाकडी हे पक्षी आढळून आले आहेत. अमरावती जिल्ह्याकरिता या पक्ष्यांची ही पहिलीच नोंद आहे. संकेत राजूरकर, प्रशांत निकम, शुभम गिरी, धनंजय भांबूरकर, प्रफुल गावंडे, अभिमन्यू आराध्य आणि मनोज बिंड या पक्षी छायाचित्रकारांनी ही नोंद घेतली आहे.
लालसर छातीची फटाकडी हा पाणकोंबडीसदृश पक्षी असून याचा लालसर तपकिरी रंग आकर्षक दिसतो. लांब पाय गडद किरमिजी रंगाचे असून काळसर चोचेचा सुरुवातीचा भाग पिवळसर असतो. हे गुपचूप राहणारे, अतिशय लाजाळू पक्षी शक्यतो पहाटेच्या वेळी आणि सायंकाळीच आपले खाद्य शोधण्यास बाहेर पडतात. यापूर्वी नागपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात नोंद झालेला हा पक्षी अमरावती जिल्ह्यासाठी मात्र अद्याप अपरिचित होता.
समुद्री बगळा हा पक्षी दक्षिण युरोप, आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंकेसह भारताच्या समुद्रकिनारपट्टीवर आढळून येतो. इतर बगळ्यांपेक्षा याच्या राखाडी रंगामुळे फार आकर्षक दिसतो. याची चोच पिवळ्या रंगाची, गळ्याचा भाग पांढरा तर पायाचे पंजे हिरवट पिवळे असतात. अमरावतीत झालेली त्याची पहिली नोंद भटक्या-स्थलांतरणाची मानली जात आहे.
लाल-पंखांचा चातक हा पक्षी भारतासह चीन, तैवान, फिलिपाईन्स आणि थायलंड या देशांमध्ये दिसून येतो. उन्हाळ्यात विशेषतः भारताच्या पूर्वोत्तर भागात हा विण घालतो व हिवाळ्यात दक्षिणेकडे स्थलांतर करतो. याची लांबी साधारणपणे ४६ ते ४८ से.मी. असते तसेच डोक्यावर चमकदार तुरा असतो. केवळ झाडांवर राहणारा लालसर रंगाचे पंख असणारा हा चातक पक्षी महाराष्ट्रात फार तुरळक नोंदवला गेला आहे. रायगड, ठाणे जिल्हा आणि मेळघाटलगतचा वन परिसर वगळता इतर ठिकाणी याच्या फारशा नोंदी आढळत नाहीत.
वातावरण बदलाचा परिणाम
यावर्षी कमी पाऊस आणि तापमानवाढीचा फटका महाराष्ट्रास बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर यावर्षी विदर्भात पक्ष्यांच्या वैविध्यपूर्ण तसेच वैचित्र्यपूर्ण नोंदीची शक्यता अक्षरशः खरी ठरत आहे.
पक्षी स्थलांतरणासाठी विदर्भाचे भौगोलिक महत्त्व
देशाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जे पक्षी-स्थलांतरण करत होते, त्यामध्ये विदर्भ प्रदेश तात्पुरत्या विश्रांतीचे किंवा थांब्याचे नैसर्गिकरीत्या महत्त्वाचे ठिकाण ठरते. म्हणून विदर्भात पक्षीविविधता आढळून येते. मात्र, पक्ष्यांसाठी हे गंतव्य स्थान नसल्यामुळे त्यांचा थांबा काही तासांचा किंवा फार फार तर काही दिवसांचा असतो.
- मनोज बिंड, वन्यजीव छायाचित्रकार