महापालिकेत ‘आऊट सोर्सिंग’ एजन्सीवर शिक्कामोर्तब?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:10 AM2021-07-23T04:10:16+5:302021-07-23T04:10:16+5:30
अमरावती : महापालिकेत २९५ कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने एजन्सीवर शिक्कामोर्तब केले आहे. निविदेतील काही जुजबी त्रुटी दूर ...
अमरावती : महापालिकेत २९५ कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने एजन्सीवर शिक्कामोर्तब केले आहे. निविदेतील काही जुजबी त्रुटी दूर करून नोएडा येथील ईटकॉन्स ई-सोल्युशन्स प्रायव्हेट कंपनीकडे ‘आऊट सोर्सिंग’द्वारे मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. आता स्थायी समितीत याविषयावर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने राबविलेल्या निविदावर काही एजन्सींनी आक्षेप घेतला होता. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने ई-निविदाबाबत सत्यता पडताळली. यात काही जुजबी त्रुटी असल्याने ‘ईटकॉन्स’ला त्या दूर करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. उपायुक्त रवि पवार यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही पार पडली. या निविदा प्रक्रियेत एकूण आठ एजन्सींनी सहभाग घेतला होता. मात्र, प्रशासनाने ‘ईटकॉन्स’ला महापालिकेत मनुष्यबळ पुरविण्यासाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी स्थायी समितीत प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविला जाणार आहे. निविदाप्रक्रियेअंती दोन महिन्यांनंतर एजन्सी नियुक्त होणार आहे.
----------------
‘आऊट सोर्सिंग’ एजन्सी नेमण्याबाबत प्रशासनाकडून अद्यापपर्यंत प्रस्ताव आलेला नाही. ई-निविदेअंती जी एजन्सी नियमात बसेल, त्या एजन्सीला मंजुरी देण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.
- सचिन रासने, सभापती, स्थायी समिती, महापालिका.