वरूड पोलिसांना पसार आरोपीचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:52+5:302021-07-01T04:10:52+5:30
पोरगव्हाण ते गणेशपूर मार्गावर १०६ जनावरे पकडली, चौघांना अटक वरूड : पोरगव्हाण ते गणेशपूर रस्त्याने कत्तलखान्यात नेण्यात येणारी १०६ ...
पोरगव्हाण ते गणेशपूर मार्गावर १०६ जनावरे पकडली, चौघांना अटक
वरूड : पोरगव्हाण ते गणेशपूर रस्त्याने कत्तलखान्यात नेण्यात येणारी १०६ जनावरे शेंदूरजनाघाट पोलिसांनी ताब्यात घेतली. चार आरोपींना अटक केली, तर पाचवा आरोपी पळून गेला. ८ लाख ४८ हजार रुपयांचे गोवंश जप्त केले.
पोलीस सूत्रांनुसार, पप्पू जगन्नाथ राजपूत (३८), जितेन परशू उर्फ बिंदू राजपूत (३०, दोन्ही रा. गोरगंज), सुंदर गोरेलाल राठोड (३२), छुटन गोरेलाल राठोड (३४, दोन्ही रा. ठिकरी जि. रायसेन, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासह अन्य एक असे पाचही आरोपी २५ जूनला दुपारी १२ वाजताच्या सुमारास पोरगव्हाण ते गणेशपूर रस्त्याने १०६ गोवंश पायदळ घेऊन जात असल्याची माहिती शेंदूरजनाघाट पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पांढऱ्या रंगाचे ६२, काळ्या रंगाचे ११, लाल रंगाचे १८ आणि भुरकट रंगाचे १५ बैल दोरीने बांधून कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेत होते. बैलांच्या अंगावर पुराणी टोचल्याचे व्रण आणि काठीचा मार होता. मानेवर, पायावर जखमा होत्या. पोलिसांनी सर्व १०६ बैल गोरक्षणाला पाठविले आहेत. आरोपींविरुद्ध भादवीचे कलम ११(१)(सी)(डी) प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम सह कलम ५(अ ), ९ महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला. पाचवा आरोपी पळून गेल्याने त्याचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास ठाणेदार श्रीराम गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहेत.