शोध मराठी मनाचा संंमेलनाचा थाटात समारोप
By admin | Published: January 4, 2016 12:09 AM2016-01-04T00:09:01+5:302016-01-04T00:09:01+5:30
जागतिक मराठी अकादमी शोध मराठी मनाचा संमेलन २०१६ चा थाटात समारोप झाला.
अभिनेते विक्रम गोखले : उद्योजक अविनाश राचमाले यांची उपस्थिती
अमरावती : जागतिक मराठी अकादमी शोध मराठी मनाचा संमेलन २०१६ चा थाटात समारोप झाला. गेल्या दोन दिवसांपासून संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे साहित्यिक, उद्योजक, कवी, अभिनेते प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती तसेच सांस्कृतिक, सामाजिक राजकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची मांदियाळी या संमेलनात अवतरली होती.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष अभिनेता विक्रम गोखले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक अविनाश राचमाले (अमेरिका), माजी आमदार बी.टी. देशमुख, सुनील देशमुख, केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष यशवंतराव गडाख, गिरीश गांधी आदी उपस्थित होते. गेल्या दोन दिवस विविध कार्यक्रमाची बौध्दीक मेजवानी अमरावतीकरांच्या रसिकांनी नवोदित साहित्यिकांनी अनुभवली होती. एकाच व्यासपीठावर अनेक आपापल्या क्षेत्रातील यशस्वी नवरत्न अंबानगरीत अवतरल्यामुळे करीयर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, मराठी भाषा व मराठी माणसाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, सर्व राजकीय लोकांनी विकासासाठी एकत्रीत येऊन काम केले तर ते भारताच्या विकासात महत्त्वाचे पाऊल ठरेल. सीमा रेषांवर देशातील प्रत्येक जाती-धर्माचा माणूस आपल्या सुुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून लढतो आहे. यामुळेच आपण सुरक्षित जीवन जगतो आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. तर मूळ भारतीय वंशाचे असलेले अमेरिकेत उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती प्राप्त आहे. असे अविनाश राचमाले म्हणाले की, भारतीय माणसाने कुठलाही प्रकारचा मणामध्ये इगो न ठेवता प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. मराठी माणसाने जगभरात अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळविले आहे. प्रास्ताविक रामदास फुटाणे, तर संचालन सोमेश्वर पुसदकर यांनी व आभार निशांत गांधी यांनी मानले. (प्रतिनिधी)