तब्बल ५० तासांनी संपले सर्च ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:18 AM2021-09-17T04:18:10+5:302021-09-17T04:18:10+5:30
वरूड : तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथील नदीपात्रात आठ जणांचे मृतदेह तब्बल ५० तासांनी शोध व बचाव पथकाला गवसले. मंगळवारी ...
वरूड : तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथील नदीपात्रात आठ जणांचे मृतदेह तब्बल ५० तासांनी शोध व बचाव पथकाला गवसले. मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता ते डोंग्यासह बुडाले होते. गुरुवारी पहिला मृतदेह पहाटे साडेपाच वाजता हाती लागला, तर शेवटचा मृतदेह दुपारी ४ वाजता. या कालावधीत जसजसे मृतदेह सापडले, तसतसा तेथे तिष्ठत बसलेल्या नातेवाइकांचा शोक अनावर होत गेला. या मृतांमध्ये नारायण मटरे वगळता सर्व तिशीच्या आत आहेत.
गाडेगाव येथून दशक्रियेसाठी श्रीक्षेत्र झुंज येथे आलेल्या मटरे, खंडाळे, शिवणकर, वाघमारे कुटुंबातील सदस्यांना डोंगीत सफर करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यातच त्यांचा घात झाला. १३ जणांची नाव डगमगली. दोघेजण पोहत सुखरूप निघाले, तर ११ लोकांना जलसमाधी मिळाली. प्रशासनाने शोध व बचावकार्य सुरू केल्यानंतर अथांग पाण्यातून तीन मृतदेह पहिल्या दिवशी काढण्यात आले. मात्र, आठ जणांचा शोध बुधवारी दिवसभरात लागला नव्हता. गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता पहिला मृतदेह हाती लागला आणि पाठोपाठ सहा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. आठवा मृतदेह सायंकाळी चार वाजता सापडला. मृतदेह पाण्यात छिन्नविच्छिन्न झाल्याने घटनस्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले व त्यांच्या गावी पोहचविण्यात आले. तब्बल ५० तासांनंतर
शोधमोहीम आटोपली. घटनास्थळावर आ. देवेंद्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, नायब तहसीलदार देवानंद धबाले, बेनोडा ठाणेदार मिलिंद सरकटे, उपनिरीक्षक दिलीप श्रीराव यांच्यासह बेनोडा, वरूड आणि शेंदूरनाघाट पोलिसांसह राज्य राखीव दलाचे पथक तळ ठोकून होते.
------------------
शोधकार्यात सात बोटी
सात बोटीवर आपत्ती व्यवस्थापनाचे ७४ अधिकारी, कर्मचारी शोधकार्य करीत होते. यात एनडीआरएफ नागपूर २२ अधिकरी आणि जवान होते. यात बिपीन बिहारी यांच्या नेतृत्वात २२ जवान सहभागी झाले. एसडीआरएफ, नागपूर येथील समादेशक पंकज डहाने, सहायक समादेशक प्रमोद लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व टीम लीडर राधेश्याम मडावी यांच्या नेतृत्वात २५ जवान होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे शोध व बचाव पथक टीम लीडर दीपक डोरस व देवानंद भुजाडे यांच्या नेतृत्वात शोध घेत होते.