सर्व महापालिका क्षेत्रात अनधिकृत इमारतींचे सर्चिंग, धोकादायक इमारतींवर पडणार हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 02:12 PM2017-10-09T14:12:44+5:302017-10-09T14:12:55+5:30
शहरातील अनधिकृत इमारती शोधून काढण्यासाठी शोधमोहीम राबविण्याचे निर्देश नगरविकास विभागाने सर्व महापालिकांना दिले आहेत.
अमरावती : शहरातील अनधिकृत इमारती शोधून काढण्यासाठी शोधमोहीम राबविण्याचे निर्देश नगरविकास विभागाने सर्व महापालिकांना दिले आहेत. सर्चिंग संपल्यानंतर या इमारतींचे 'स्ट्रक्चरल आॅडिट' करण्यात येणार आहे. अशा इमारतींमुळे होणारी जीवितहानी लक्षात घेता अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाईचा अग्रक्रम ठरविण्याच्या दृष्टीने या इमारतींची वर्गवारी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
राज्यातील अनेक भागांतील अनधिकृत इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास असल्याने त्या सर्व इमारती तत्काळ खाली करून तोडणे व्यवहार्य नाही. त्या पार्श्वभूमीवर अशा इमारतींची वर्गवारी बांधकामाच्या दर्जाच्या आधारावर करण्यात यावी व त्यासाठी अनधिकृत इमारतींचे 'स्ट्रक्चरल आॅडिट' करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये ज्या इमारती धोकादायक सिद्ध होतील, त्यातील रहिवाशांना बाहेर काढून त्या इमारती पाडून टाकण्यात याव्यात, तशी अंमलबजावणी सर्व नागरी लोकल बॉडीने करावी, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.
अनधिकृत बांधकामामुळे होणा-या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी या उपायययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. अनधिकृत बांधकामाविरुद्ध सौम्य धोरण असल्याचा गैरफायदा घेत काही बांधकाम व्यावसायिक अनधिकृतपणे बांधकाम करतात, अशा इमारतींमध्ये मुद्दामच काही नागरिकांना वास्तव्यास ठेवून कारवाईपासून बचावाचा पवित्रा घेतात. हे चौकशीदरम्यान उघड झाल्याचे स्पष्ट करीत नगरविकासने सक्त निर्देश दिले आहेत.
संकेतस्थळावर बांधकाम प्रकल्पाची यादी
सर्व नागरी क्षेत्रात विकास प्रस्तावांतर्गत बांधण्यात येणा-या व बांधलेल्या इमारतींची यादी, सविस्तर विकास प्रकल्प, त्यांची मंजुरी, याबाबत इत्यंभूत माहिती सर्वसामान्य नागरिकांना कळावी, याकरिता ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश सर्व नियोजन प्राधिकरणांना देण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकाम करू नका
अनधिकृत बांधकामाची यादी प्रसिद्ध करावी, नागरिकांना आवाहन करून त्याबाबत व्यापक जनजागृती करावी, तसेच स्थानिक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र व होर्डिंग्जच्या माध्यमातून नागरिकांना अनधिकृत इमारतीत घर घेण्यापासून परावृत्त करावे, असे निर्देश न.पा. महापालिकांना देण्यात आले आहे. या आदेशाचे सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सर्व नियोजन प्राधिकरणांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अनधिकृत इमारती शोधून काढण्यासाठी शोधमोहीम राबविण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्याअनुषंगाने झोनस्तरावर या मोहिमेने वेग घेतला असून, अशा मालमत्तांवर दंड आकारणी केली जात आहे. मालमत्ता मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान ही मोहीम राबविली जात आहे.
हेमंतकुमार पवार, आयुक्त, महापालिका अमरावती