मध्यरात्रीपासून एसटीची हंगामी भाडेवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:25 PM2018-10-30T22:25:58+5:302018-10-30T22:26:17+5:30
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने हंगामी भाडेवाढ करण्यात येणार आहे. ही भाडेवाढ ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल व २० नोव्हेंबरपर्यंत लागू राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने हंगामी भाडेवाढ करण्यात येणार आहे. ही भाडेवाढ ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल व २० नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. ही भाडेवाढ साधारणत: सहा किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी दहा टक्के याप्रमाणे २ रुपये २५ पैसे अशी वाढ होणार आहे.
शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ सूत्रानुसार प्रमुख चार घटकांच्या मूल्यात होणार आहे. त्यानुसार सुधारित प्रवास भाडेवाढीस राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये साधी, जलद, रात्रसेवा निमआराम आणि वातानुकूलित शिवशाही आसनी या सेवा प्रकारात १० टक्केप्रमाणे वाढ होणार आहे. यामुळे १ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पहिल्या टप्प्यात प्रौढांसाठी १० रुपये आणि मुलांसाठी ५ रुपये याप्रमाणे भाड्याची आकारणी करण्यात येणार आहे. शिवशाही आसनी या गाडीच्या भागात पहिल्या टप्प्यासाठी १५ रुपये प्रमाणे भाडेवाढ होणार आहे.एसटीच्या अन्य सेवा आहेत. त्यामध्ये वातानुकूलित शिवशाही, (शयनी) वातानुकूलित शिवनेरी (आसनी) या सेवांच्या भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. पूर्वीप्रमाणेच प्रवासी भाड्याची आकारणी केली जाणार आहे. शासनाच्या आदेशानुसार अनुज्ञेय असणाऱ्या सवलती यापुढे सुरू ठेवण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी सुधारित भाडेवाढीप्रमाणे तिकिटाचा दर राहील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. ज्या प्रवाशांनी दिवाळीनिमित्ताने गावी जाण्यासाठी एक ते दीड महिना अगोदर आगाऊ आरक्षण केले असेल अशा प्रवाशांकडून सुधारित भाड्यापोटी होणारी फरकाची रक्कम वाहकामार्फत वसूल केले जाईल.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाला ३० टक्के हंगामी दरवाढ करण्याची मुभा आहे. यंदाच्या दिवाळीत १० टक्के हंगामी दरवाढ करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे.
- श्रीकांत गभने,
विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ अमरावती