मुंबई एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातील ‘सीट’ चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:04 PM2018-05-07T23:04:38+5:302018-05-07T23:05:12+5:30

पैसे कमविण्याचा ‘शॉर्टकट’ कोणी कसा शोधून काढेल, याचा नेम नाही. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात ‘सीट’ चोरून प्रवाशांना विकण्याचा फंडा काही महाभागांनी शोधून काढला आहे. यात रेल्वेचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

'Seat' theft in the General Box of Mumbai Express | मुंबई एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातील ‘सीट’ चोरी

मुंबई एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातील ‘सीट’ चोरी

Next
ठळक मुद्देसामान्यांचा जीवघेणा प्रवास : रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचा ‘आशीर्वाद’

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पैसे कमविण्याचा ‘शॉर्टकट’ कोणी कसा शोधून काढेल, याचा नेम नाही. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात ‘सीट’ चोरून प्रवाशांना विकण्याचा फंडा काही महाभागांनी शोधून काढला आहे. यात रेल्वेचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
‘लोकमत’ चमूने ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मॉडेल स्टेशन, वॉशिंग युनिटसह प्लॅटफार्मवर फेरफटका मारला असता अंबा एक्स्प्रेसच्या जनरल डब्यांमध्ये ‘सीट’ विक्री होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. सायंकाळी ५ वाजता प्लॅटफॉर्मला गाडी लागते तेव्हा डबे कुलूपबंद असतात. मात्र, त्यापूर्वीच जनरल डब्यात काही युवक सीट काबीज करून ठेवतात. ते कंत्राटी स्वच्छता कर्मचारीच असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याची माहिती आहे. जनरल डब्यांना कुलूप लावणे आणि गाडी प्लॅटफार्मवर आल्यानंतर उघडण्याची जबाबदारी सोपविली आहे. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाला हा प्रकार दिसू नये, ही बाब आश्चर्यकारक मानली जात आहे.
चोरीच्या सीट विक्रीसाठी दलाल
अंबा एक्स्प्रेसमध्ये तुडुंब गर्दी ही नित्याचीच बाब आहे. आरक्षण वेळेवर मिळत नसल्याने काही जण जनरल डब्यातून प्रवासाला प्राधान्य देतात. जनरल डब्यात सीट पाहिजे असल्यास प्लॅटफार्मवर ठरलेल्या दलालांशी वाटाघाटी कराव्या लागतात. जनरल डब्यासाठी प्रतिसीट ३०० ते ४०० रूपये प्रवाशांना मोजावे लागतात. जनरल डब्यात प्रवेश मिळविण्यासाठी तासन्तास रांगेत असलेल्या प्रवाशांना दलाल हेरतात. नाइलाज असलेल्या प्रवाशांना जनरल डब्यातही जागा विकत घेण्याचा प्रसंग ओढवत आहे.
जनरल डब्यात जीवघेणा प्रवेश
अंबा एक्स्प्रेस प्लॅटफार्मवर आल्यानंतर जनरल डब्यात प्रवेशाच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवेश करावा लागतो. यावेळी चेंगराचेंगरी अन् गुदमरण्यापर्यंत विदारक स्थिती निर्माण होते. तथापि, रेल्वे पोलीस या गंभीर बाबीकडे मूकपणे बघत असल्याचे वास्तव आहे.
प्लॅटफार्म लांबलचक रांग कशासाठी?
जनरल डब्यात प्रवेशासाठी प्लॅटफार्मवर लांबलचक रांग लावली जाते. त्यात काही युवक शिरकाव करतात. त्यांना रेल्वे पोलिसांचा ‘आशीर्वाद’ असल्याचे दिसून येते. यावेळी एकच पोलीस कर्मचारी तैणात का ठेवले जाते, हा संशोधनाचा विषय आहे.

Web Title: 'Seat' theft in the General Box of Mumbai Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.