सेतू केंद्रावरील सातबारा योजनेचा फज्जा
By admin | Published: June 19, 2015 12:40 AM2015-06-19T00:40:34+5:302015-06-19T00:40:34+5:30
शासनाने पटवाऱ्यांना सातबारा आॅनलाईन करण्याचे आदेश दिल्यापासून हा निर्णय प्रत्यक्षात येईपर्यंत त्यात अनेक चुका झाल्या आहेत.
जुन्याच नोंदी : अंजनगाव तालुक्यातील शेतकरी अडचणीत, कर्ज मिळण्यास अपात्रतेची पावती
अंजनगाव सुर्जी : शासनाने पटवाऱ्यांना सातबारा आॅनलाईन करण्याचे आदेश दिल्यापासून हा निर्णय प्रत्यक्षात येईपर्यंत त्यात अनेक चुका झाल्या आहेत. त्यामुळे ‘अद्ययावत सातबारा’ ही केवळ लोकप्रिय घोषणा ठरली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी सातबारा आॅनलाईन काढल्यावरदेखील त्यांच्यावर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. या सातबाऱ्यामध्ये जुन्याच नोंदी असून कित्येक सातबाऱ्यामधील मालकाचे नाव गायब आहेत. मात्र, कर्ज घेतल्याची नोंद सातबाऱ्यावर कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेताना अडचणी येत आहेत. सेतू केंद्रावर गावोगावी शेतकऱ्यांनी सातबारा मिळविण्यासाठी गर्दी केली असून प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पदरी सातबारा न पडल्याने निराशा आली आहे.
शासनाने पटवाऱ्यांना सातबारा यापुढे गावातून न देण्याचे आदेश दिले व सर्व शेतकऱ्यांनी आपला सातबारा संगणक सेतू केंद्रातून घेण्याचे आवाहन केले. मात्र, योजनेचे केंद्रीकरण करुन आपण एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या शेतकरी खातेदारांना बोटावर मोजण्याइतपत सेतू केंद्रातून खरोखरच सातबारा वितरित करु शकतो काय? याचा विचार मात्र झाला नाही. पर्यायाने ही संपूर्ण योजना कोलमोडली आहे व याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. आपल्या हक्काचे कमाईचे साधन गेले म्हणून पटवारी वर्गानेही सातबारा अद्ययावत करण्याच्या नोंदी संगणकात केल्याच नाहीत, याचे अनेक पुरावे आहेत.
स्थानिक तहसीलच्या सेतू केंद्रात सातबारा प्राप्त झाला नाही. म्हणून महसूल अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तहसीलदार प्रदीप पवार यांनी तातडीने सर्व तलाठ्यांची सभा घेऊन सातबाराच्या नोंदी तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहे.
पण, हे काम कितीही घाईने केली तरी कामे आटोपत नसल्याने शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत आहेत. शासनाने निराधार योजनेचे पोस्ट खात्यामार्फत गावागावांत होणारे वेतन वितरण थांबवून बँकांमार्फत केल्याने जशा बँकांचे कामकाज गर्दीमुळे प्रभावित झाले तसेच सेतू केंद्राचे हाल होत आहेत.
या योजनेचा पूर्णत: विचार करुन शेतकऱ्यांना तातडीने व गरज असल्यास पटवाऱ्यांकडून हाताने लिहिलेला सातबारा वितरित करण्याची मागणी महेश खारोळे, संजय हाडोळे, कपिल देशमुख, शंतनू भांबुरकर, श्याम गायगोले आदी युवा शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांची अडचण ओळखून तातडीने सातबाऱ्याची समस्या निकाली काढावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सातबाऱ्यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण दूर व्हावी, एवढी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.