कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस आता ८४ दिवसांनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:29+5:302021-05-20T04:13:29+5:30
अमरावती : शासनाकडून होणारा अपुरा लसीचा पुरवठा त्यातून लसीकरण केंद्रावर होणारा गोंधळ आणि वादावादी टाळण्यासाठी कोविड ...
अमरावती : शासनाकडून होणारा अपुरा लसीचा पुरवठा त्यातून लसीकरण केंद्रावर होणारा गोंधळ आणि वादावादी टाळण्यासाठी कोविड शिल्ड लसीचा दुसऱ्या डोजचा कालावधी एकदम दुप्पट दिवसांनी वाढविला आहे. त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर आता दुसऱ्या डोससाठी नागरिकांना ८४ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस महिनाभरात दिला जाणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाच्यावतीने पाच महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लस मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर २८ दिवसांचे ठेवण्यात आले होते. त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना ही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी वाढू लागली. लोकांना लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारण्याची वेळ आली. पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोन्ही डोसमधील अंतर २८ दिवसांवरून ४२ दिवस करण्यात आले होते. आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे. पहिला व दुसरा डोसमधील कालावधी ४२ दिवसांवरून थेट ८४ दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे कोविडशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसांपेक्षा कमी कालावधी झाला असल्यास दुसरा डोस मिळणार नाही. मात्र, को व्हॅसिनचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ ते ३० दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार असल्याचे डॉ.करंजीकर यांनी सांगितले.
कोट
शासनाच्या निर्देशानुसार कोविडशिल्ड लसीच्या डोसमधील कालावधी ८४ दिवसांचा करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे.
- दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी