दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:29+5:302021-06-09T04:15:29+5:30
अमरावती/संदीप मानकर गत सव्वा वर्षापासून कोरोनाने अमरावती जिल्ह्यासह राज्यात थैमान घातले. मात्र, राज्यातील दुसरी लाट ही अमरावती जिल्ह्यातून सुरू ...
अमरावती/संदीप मानकर
गत सव्वा वर्षापासून कोरोनाने अमरावती जिल्ह्यासह राज्यात थैमान घातले. मात्र, राज्यातील दुसरी लाट ही अमरावती जिल्ह्यातून सुरू झाली. त्यामुळे सर्वाधिक कोरोनाबाधित अमरावती जिल्ह्यात नोंदविले गेले. अशा स्थितीत पुणे-मुंबईतील बड्या पगारावरील अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेक तरुण ‘वर्क फ्राॅम होम’साठी शहरात आले. ज्यांच्या नोकऱ्या गेल्याने संसाराची घडी विस्कटली त्यात फ्रेबुवारीपासून सततच्या लॉकडाऊनमुळे दुसऱ्या लॉडाऊनने वैवाहिक जीवनात विष कालवले!
प्राप्त महितीनुसार, शहर पोलीस आयुक्तालयाच्या महिला भरोसा सेलमध्ये १ जानेवारी ते ३१ मे २०२१ पर्यंत पाच महिन्यात २८२ महिलांच्या कौटुंबिक कलहाच्या तक्रारी प्राप्त झाल्या. महिला सेलच्या पोलिसांनी नवरा -बायकोला महिला सेलमध्ये बोलावून त्याचे समुपदेशन करून १११ प्रकरणात समेट घडवून आणली. काही प्रकरणे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. काही प्रकरणात कलम ४९८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला, तर काही प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सन २०२० मध्ये ६२४ महिलांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ६२० प्रकरणांत समेट घडविण्यात यश आल्याचे महिला सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक हिरोडे यांनी सांगितले.
भरोसा सेलमध्ये मार्च २०२० पासून आलेल्या एकूण तक्रारी
९०६
दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात आलेल्या तक्रारी
२८२
बॉक्स
१११ पती-पत्नींचे भांडण सोडविले
पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ दरम्यान एकूण २८२ महिलांच्या कौटुंबिक वादाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १११ पती- पत्नींची भांडणे भरोसा सेलच्या टिमने सोडविली. मात्र, काही प्रकरणात समेट न घडल्याने अखेर गुन्हा नोंदविण्यासाठी पाठविण्यात आले. काही प्रकरणात घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
बॉक्स
पैसा हेच कारण
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींच्या नोकऱ्या टिकल्या, तर त्यांना वर्क फ्राॅम होम अर्ध्या पगारावर दिले गेले. मात्र, लाईफस्टाईल ही पूर्वीचीच होती. पैशाची कमतरता भासायला लागली. फ्लॅट, वाहनांची ईएमआय (किस्त) भरायला त्रास झाला. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये मतभेद निर्माण होऊन वाद झाले. त्यातून महिला सेलकडे तक्रारी वाढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले.
बॉक्स
पुण्याची नोकरी गेली अन्
पत्नी डफरीन येथे नर्स म्हणून जॉब करते. पतीची पुण्याला चांगल्या पगाराची नोकरी होती. मात्र, कोरोनामुळे व दुसऱ्या लाटेमुळे जॉब गेल्याने पती अमरावतीला पत्नीकडे राहायला आले. त्यानंतर बहिणीचाही हस्तक्षेप वाढय्यामुळे कौटुंबिक कलह निर्माण झाला होता. हे प्रकरण भरोसा सेलकडे आल्यानंतर येथील महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीस पुढाकार घेऊन दोघांचीही समजूत काढली. जॉब काही दिवसानंतर मिळू शकते. मात्र, संसार उद्वध्वस्त करून नको, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांचा संसार पुन्हा सुरू झाला.
कोट
पूर्वी सासू-सुनेचे पटत नाही म्हणून तक्रारी यायच्या. मात्र, गत वर्षभरात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने संसाराची घडी विस्कली. लॉकडाऊनमध्ये पती-पत्नी घरीच होते. त्यामुळे वाद झाल्याच्या सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र, त्यांचे समुपदेशन करून अनेकांचे संसार पूर्वपदावर आणण्यात यश आले. यामध्ये पोलीस आयुक्त आरती सिंह यांचे टिमला चांगले मार्गदर्शन मिळाले.
- शीतल हिरोडे, सहायक पोलीस निरीक्षक, महिला सेल