अभ्यासक्रम वेगळा गुणपत्रिकेत दुसरेच विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:13 PM2019-07-03T23:13:38+5:302019-07-03T23:13:57+5:30
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता संपेना, हे विदारक चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता संपेना, हे विदारक चित्र आहे.
विद्यापीठात गत तीन वर्षांपासून परीक्षा आणि निकाल सुरळीत लागले असतील, असे क्वचितच घडले आहे. असाच धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला. अमरावती येथील श्री. शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालयातील एम.ए. भाग २ (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी प्रसेनजित बाबूराव इंगोले याने उन्हाळी २०१९ परीक्षेत सेमिस्टर ४ ची परीक्षा दिली. त्याने पदव्युत्तर राज्यशास्त्र अभ्यासक्रमाचे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अॅन्ड थिअरी, रिसर्च मेथडॉलॉजी, डिप्लोमसी अॅन्ड इंडियन फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल लॉ अॅन्ड इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन, असे चार पेपर दिले. मात्र, डिप्लोमसी अॅन्ड इंडियन फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल लॉ अॅन्ड इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन या दोन विषयांऐवजी पॉलिटिकल सोशालॉजी व पॉलिटिकल अथ्रॉपॉलाजी हे दोन विषय गुणपत्रिकेवर नमूद करून त्यांचे गुण देण्यात आले आहे. जे विषय अभ्यासक्रमात घेतले नाही, त्याचे गुण नमूद करून चक्क उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका हाती पडल्याने सदर विद्यार्थी गोंधळून गेला आहे. अशाच प्रकार श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, तक्षशीला महाविद्यालय, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील पदव्युत्तर राज्यशास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसोबत झाल्याची माहिती मिळाली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध असुनही अचूक निकाल कधी लागणार, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
चूक परीक्षा विभागाची, हेलपाटे विद्यार्थ्यांना
एम.ए. राज्यशास्त्र भाग २ सेमिस्टर ४ पेपर वेगळ्याच विषयाचे सोडविले आणि उत्तरपत्रिका वेगळ्याच विषयाची मिळाल्याबाबत विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठ गाठले. परीक्षा व मूल्यांकन विभागात प्रसेनजित इंगोले या विद्यार्थ्याने कैफियत मांडली. मात्र, गुणपत्रिकेवरील चूक दुरूस्त करून मिळेल. त्याकरिता २० दिवसांचा अवधी लागेल, असे उत्तर देत विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते.