काँग्रेसच्यावतीने नोटाबंदीचे द्वितीय वर्षश्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:11 PM2018-11-12T22:11:41+5:302018-11-12T22:12:09+5:30
केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे दुसरे वर्षश्राद्ध काँग्रेसने सोमवारी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करीत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे दुसरे वर्षश्राद्ध काँग्रेसने सोमवारी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करीत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. आमदार यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जवाब दो मोदीजी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजारांच्या नोटा व्यवहारातून बाद झाल्याचे जाहीर केले होते. यामुळे देशातील लघु उद्योग बंद पडलेत. शेतकरी लहान व्यवसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. उलट याचा फटका व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना सहन करावा लागला. या नोटबंदीत कित्येक जणांचे बळी गेले. याशिवाय महागाईचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यामुळे यावर नियंत्रण घालणार तरी कोण, नोटाबंदीचे लाभार्थी कोण, नोटाबंदीमुळे काळा पैसा किती जमा झाला व हा काळा पैसा कोणाकडून आला त्यांची नावे जाहीर करावी, अशी मागणी बबलू देशमुख यांनी केली. आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या, या निर्णयामुळे देशाची व पर्यायाने सामान्य माणूस अडचणीत आला. निरव मोदी, विजय मल्ल्यायासारखे अनेक उद्योजक पैसे घेऊन देशातून पळून गेले. वास्तविक ठरावीक उद्योजकांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. नोटबंदीसह सरकारच्या जनहितविरोधी धोरणाची त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. देशाची अर्थव्यवस्था अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही.
शेतकरी, सर्वसामान्य वाढत्या महागाईने त्रस्त आहेत. त्यामुळे या सरकारच्या जनहित विरोधी धोरणाला आता जनता कंटाळली असून, आगामी निवडणुकीत भाजप सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या. यावेळी झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी आमदार केवलराम काळे, नरेशचंद्र ठाकरे, झेडपी सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, महेंद्र गैलवार , महिला काँग्रेसच्या अध्यक्षा छाया दंडाळे, श्रीपाल पाल, सतीश हाडोळे, नितीन दगडकर, सुरेश निमकर, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, प्रवीण वाघमारे, सुधाकर भारसाकळे, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, भैयासाहेब मेटकर, दिलीप काळबांडे, हरिभाऊ मोहोड, सतीश उईके, मुकद्दर खॉ, विनोद गुळदे, गणेश कडू, बाबुराव जवंजाळ, भागवत खांडे, वासंती मंगरुळे, श्रीराम नेहर, राहुल येवले, दयाराम काळे, सुरेश आडे, अनंत साबळे, मोहन सिंघवी, बंडू देशमुख, प्रदीप वाघ, प्रदीप देशमुख, हरीश मोरे, वीरेंद्रसिंह जाधव, बापूराव गायकवाड, सतीश धोंडे, अनिरूद्ध बोबडे, बच्बू बोबडे आदींचा समावेश होता.
घोषणाबाजी परिसर दुमदुमला
जिल्हा काँग्रेसच्या नोटाबंदी विरोधातील आंदोलनात नोटाबंदी का क्या हुआ, हिसाब दो जवाब दो, हुकूमशाही प्रवृत्तीच्या धिक्कार असो, अशा घोषणा देऊन काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा निषेध केला.
भाजप सरकारच्या जनहित विरोधी धोरणाला आता जनता कंटाळली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निश्चितच भाजप सरकारला धडा शिकवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही.
- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा
नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. याचा फटका शेतकरी व सर्वसामान्यांना बसला आहे. वाढती महागाई, कर्जमाफी आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. जनहित विरोधी भूमिका घेणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवणे गरजेचे आहे.
- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस ग्रामीण
नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाले. मात्र, देशाची अर्थव्यवस्था अद्यापही पूर्वपदावर आली नाही. शेतकरी, शेतमज तर व्यापारी जीएसटीमुळे अडचणीत आले आहेत. मात्र, जनतेला दिलासा देण्याऐवजी अन्यायाचे धोरण अवलंबिले आहे.
- वीरेंद्र जगताप,
आमदार धामनगांव रेल्वे