सचिवांनी केली लाखोंची हेराफेरी, रोजगार हमी योजनेतील सेवकांचे कमिशन हडपल्याची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:36 IST2024-12-18T12:35:19+5:302024-12-18T12:36:02+5:30
Amravati : मेळघाटात म्हणे, काहीही चालते; रोजगार सेवकांचे कमिशन लाटले

Secretary embezzled lakhs, complained of grabbing commission of servants under employment guarantee scheme
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील दहेन्द्री काजलडोह गांगरखेडा व हतरू येथील ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र रोजगार हमी योजनेत कार्यरत रोजगार सेवकांचे मागील तीन वर्षांपासून कामाचे लाखो रुपये कमिशन सचिवांनी परस्पर हडपल्याची तक्रार पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. तक्रार मिळताच बीडीओंनी चौकशीचे तसेच संपूर्ण कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात सर्वाधिक महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामे चिखलदरा तालुक्यात केली जातात. दररोज किमान ५० हजारांहून अधक मजूर उपस्थिती असते. त्यामुळे लाखो रुपयांचे कमिशन रोजगार सेवकांना वर्षाकाठी मिळते. मागील तीन वर्षांपासून हे कमिशन रखडले होते. ते कमिशन परस्पर सचिवांनी हडपल्याची तक्रार दहेन्द्री येथे संजू भाना येवले यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना केली. हतरू, गांगरखेडा व काजलडोसह इतरही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक योगेश महोरे व हतरू येथील तत्कालीन सचिव विनोद कांबळे यांनी हा प्रताप केल्याची लेखी तक्रार सादर करण्यात आली. याबाबत फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
पेसा निधीच्या चौकशीची मागणी
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात पेसा कायद्यांतर्गत ग्रामपंचायतींना लाखोंचा निधी प्राप्त होतो. विविध विकासात्मक कामे, साहित्य खरेदी त्यामध्ये करता येते, परंतु मोठ्या प्रमाणात त्याचा ग्रामपंचायींमध्ये हिशेबच नसल्याने त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले आहे.
दहेंद्रीत वडिलांच्या नावाने धनादेश
मेळघाटात अपहाराच्या नवीन पद्धती आता पुढे येऊ लागल्या आहेत. ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांनी संगनमताने अपहर केल्याचा आरोप आहे. सचिव योगेश प्रभाकर माहोरे याने वडील प्रभाकर गोविंद माहोरे यांच्या नावे सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या चिखलदरा शाखेत खाते क्र. २३८७८२६३६२ तयार करून ७ जानेवारी ते २१ एप्रिल २०२३ पर्यंत बँकेतून २ लक्ष ९६ हजारांचे धनादेश वटविले असल्याची तक्रार संजय येवले यांनी केली.
हतरूमध्ये व्हीडीओने लाटले कमिशन
हतरू ग्रामपंचायत अंतर्गत मार्च २०२४ ते जुलै २०२४ या कालावधीचे ७ लाख ५ हजार ४०० रुपये कमिशन रोजगार सेवकांना वाटप करण्यात आले. परंतु, कारंजखेडा येथील रोजगार सेवक मोतीलाल कालु जामुनकर यांना ९० हजार रुपये कमिशन मिळाले. त्यामधून केवळ ६० हजर रुपयेच व्हीडीओ विनोद कांबळे यांनी दिले. त्यापैकी १० हजार रुपये सरपंचपती व २० हजार रुपये स्वतः कमिशन ठेवल्याची तक्रार करण्यात आली आहे.
"दहेंद्री, गांगरखेडा, हतरू येथील ग्रामपंचायतीमध्ये सचिवांनी ग्राम रोजगार सेवकांच्या कमिशनमध्ये अपहार केल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिद्ध होताच कठोर कारवाई करण्यात येईल."
- शिवशंकर भारसाखळे गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा