जवळा शहापूर सेवा सहकारी संस्थेचे सचिव गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:04 AM2021-08-02T04:04:44+5:302021-08-02T04:04:44+5:30
चांदूर बाजार : तालुक्यातील जवळा शहापूर सेवा सहकारी संस्थेचे प्रशासक व सचिव गेल्या आठवडाभरापासून कार्य क्षेत्राबाहेर असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना ...
चांदूर बाजार : तालुक्यातील जवळा शहापूर सेवा सहकारी संस्थेचे प्रशासक व सचिव गेल्या आठवडाभरापासून कार्य क्षेत्राबाहेर असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना कर्जप्रक्रियेपासून मुकावे लागत आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी सहायक उपनिबंधक, चांदूर बाजार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. पीक कर्जाअभावी शेतीचे नुकसान होत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
तालुक्यातील जवळा शहापूर येथील सेवा सहकारी संस्था गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आलेली आहे. या सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून गावातील काही शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज केला होता. यापैकी साहेबराव पाथरे यांचे प्रकरण मंजूरसुद्धा झाले होते. मात्र, सेवा सहकारी संस्थेचे प्रशासक व सचिवांनी मंजूर प्रकरण बँकेला पाठवलेदेखील नाही. इतर शेतकऱ्यांचे नवीन कर्ज प्रस्तावसुद्धा तयार आहेत.
सध्या शेतात पिकाची काळजी घेण्याकरिता पिकावर फवारणी, निंदण, डवरणीसारखे महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहे. याकरिता शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो. पैशांअभावी शेतीची मशागत करावी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. पीक कर्ज काढून शेतकरी आपल्या शेतातील मशागतीची कामे मार्गी लावतात. मात्र, जवळा सेवा सहकारी संस्थेचे सचिव व प्रशासक आठवडाभरापासून आपल्या कार्यक्षेत्रात उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाला विलंब होत आहे.
कर्जाअभावी शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सहायक उपनिबंधकांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे, जवळा शहापूर सेवा सहकारी संस्था सचिव प्रीती चौधरी यांच्याकडे तालुक्यातील चार सोसायट्यांच्या सचिवपदाचा कार्यभार आहे. त्या कोणतीच पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्याने या चारही गावातील शेतकऱ्यांचे कर्जप्रकरणे अडकली आहेत.
----------------------
जवळा शहापूर सेवा सहकारी संस्थेच्या सचिव प्रीती चौधरी या गेल्या काही दिवसांपासून अनुपस्थित असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या सुटीबाबत कोणताच अर्ज कार्यालयाला प्राप्त नाही. शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान पाहता नोटीस बजावण्यात आली आहे.
- राजेश भुयार, सहायक उपनिबंधक