राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात सुरक्षा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:35 PM2018-03-29T21:35:56+5:302018-03-29T21:35:56+5:30
मोर्शी ते परतवाडा मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात पिवळ्या मातीचा मोठ्या प्रमाणात सर्रास उपयोग सुरू आहे. परिणामी या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे चांदूर बाजारनजीक अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
सुमित हरकूट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : मोर्शी ते परतवाडा मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात पिवळ्या मातीचा मोठ्या प्रमाणात सर्रास उपयोग सुरू आहे. परिणामी या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे चांदूर बाजारनजीक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन पुढे न्यावे लागत आहे.
काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हिरव्या झाडांच्या कत्तलीनंतर खोदलेल्या रस्त्यात मुरुमाऐवजी मोठ्या प्रमाणात पिवळी माती भरली जात आहे. वास्तविक, काँक्रीटीकरणासाठी त्याखाली ४० मी.मी. दगड, मुरुमाचा थर आवश्यक असतो. रस्त्याची मजबुती भविष्यात किती राहील, हेच यावरून स्पष्ट होते. पिवळ्या मातीवर लगेच पाणी मारणे गरजेचे असताना एका टँकरने रस्त्याच्या कडा भिजविल्या जात आहेत. परिणामी या कच्च्या रस्त्यावरून मोठी वाहने धूळ उडवत जातात. यामुळे समोरून येणारी वाहने दिसणे कठीण असल्याने येथे नुकतेच दोन अपघात झाले आहेत.
दररोज अपघात
सोमवारी सकाळी ११ वाजता हैदतपूर गावानजीक पिवळ्या मातीच्या धुळीमुळे तुरीची वाहतूक करणारा ट्रक उलटला. यावेळी रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने फारशी हानी झाली नाही. मंगळवारी सकाळी एक युवक आपल्या ८० वर्षीय आजीला दुचाकीवर घेऊन जात होता. पिवळ्या मातीवरून त्यांचे वाहन घसरून वृद्धा खाली कोसळली.
कुठे आहेत सुरक्षेचे उपाय?
राष्ट्रीय मार्गाचे काम एचडी कन्स्ट्रक्शनतर्फे केले जात आहे. या वाहतुकीच्या रस्त्यावर कुठेही सुरक्षा कठडे, फलक दिसत नसून, केंद्र शासनाने मंजूर केलेला हा रस्ता सामान्य नागरिकांच्या जिवावर उठल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कंत्राटदाराने वेळीच सुरक्षिततेचे उपाय न केल्यास नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.