सीसीटिव्हीने ‘त्या’ला पोहोचविले पोलीस कोठडीत!
By प्रदीप भाकरे | Published: June 22, 2023 05:14 PM2023-06-22T17:14:49+5:302023-06-22T17:16:57+5:30
सुरक्षारक्षकच निघाला चोर : वेअर हाऊसमधील ४.४१ लाख रोकड लांबविल्याचे प्रकरण
अमरावती : विलासनगर परिसरातील रिलायन्स वेअर हाऊसमधून ४ लाख ४१ हजार ८८६ रुपयांची रोकड तेथेच कार्यरत सुरक्षारक्षकानेच लांबविल्याचे उघड झाले. लॉकर उघडून त्यातून ती रक्कम चोरून नेताना एकजण सीसीटिव्हीत कैद झाला होता. त्या फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले. २० जून रोजी सकाळी ती घटना उघड झाली होती. सोपान रमेश पुर्भे (२९,रा. भांबोरा, दर्यापूर) असे अटक सुरक्षारक्षकाचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये जप्त करण्यात आले.
रिलायन्स वेअर हाऊसच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून तेथील लॉकरमधून ४ लाख ४१ हजार ८८६ रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. १९ जून रोजी पहाटे ३.१५ ते ३.३० दरम्यान झालेली ती चोरी सीसीटिव्हीत कैद झाली होती. चोरीची बाब लक्षात आल्यावर वेअर हाऊसचे व्यवस्थापक सचिन वांगे (३८, रा. न्यू सोनल कॉलनी) यांनी २० जून रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी सायंकाळी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासादरम्यान त्या गुन्ह्यात वेअर हाऊसमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत सोपान पुर्भे याचा हाथ असल्याचे समोर आले.
गुन्ह्याची कबुली
गुन्हे शाखेने सोपानला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, अजय मिश्रा, सुरज चव्हाण, निवृत्ती काकड, भूषण पद्मणे यांनी केली.