दहा एटीएमपैकी केवळ दोन ठिकाणीच सुरक्षा रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 05:00 AM2021-08-13T05:00:00+5:302021-08-13T05:00:52+5:30

शहरात विविध बँकांची सुमारे १५२ एटीएम सेंटर आहेत. शहरात आतापर्यंत दोन वेळा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.  विशेष म्हणजे, या एटीएमपैकी एकाही एटीएमला सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता तसेच एकाही एटीएममध्ये सायरन सिस्टीम बसवलेली नव्हती. अमरावतीकरांच्या सुदैवाने शहरात अद्याप तरी एकाही ठिकाणाला कुठल्याही अनुचित घटनेचा स्पर्श झालेला नाही. 

Security guards at only two of the ten ATMs | दहा एटीएमपैकी केवळ दोन ठिकाणीच सुरक्षा रक्षक

दहा एटीएमपैकी केवळ दोन ठिकाणीच सुरक्षा रक्षक

googlenewsNext

प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील सर्व बँकांनी एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ठरवून दिलेल्या मानकांना फाटा दिला आहे. गत आठवड्यात तपोवन परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात चौघांना अटकदेखील करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने लोकमतने गुरुवारी दुपारी शहरातील १० एटीएमची स्थिती न्याहाळली. त्यात १० पैकी जिल्हा बँक व इर्विन चौक स्थित दोन एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आढळून आले. 
आरबीआयने एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक, सायरन, सीसीटीव्ही कॅमेरे, फ्लॅश लाइट्स अशा प्रकारची मानके आखून दिली आहेत. मात्र, अद्याप एकाही बँकेने एटीएम सुरक्षिततेच्या बाबतीत या मानकांची पूर्तता केली नसल्याचे समोर आले आहे. शहरात विविध बँकांची सुमारे १५२ एटीएम सेंटर आहेत. शहरात आतापर्यंत दोन वेळा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.  विशेष म्हणजे, या एटीएमपैकी एकाही एटीएमला सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता तसेच एकाही एटीएममध्ये सायरन सिस्टीम बसवलेली नव्हती. अमरावतीकरांच्या सुदैवाने शहरात अद्याप तरी एकाही ठिकाणाला कुठल्याही अनुचित घटनेचा स्पर्श झालेला नाही. 

येथे नोंदविले निरीक्षण
‘लोकमत’ने राजकमल चाैक, राजापेठ, कंवरनगर मार्गावरील दोन, शंकरनगर, गर्ल्स हायस्कूल, गांधी चौक, गाडगेनगर व इर्विन चौकातील दोन अशा एकूण १० ठिकाणच्या एटीएमची स्थिती जाणून घेतली. पैकी इर्विन चौकातील दोन्ही एटीएम स्थळी सुरक्षारक्षक आढळून आले. तेथील एका ठिकाणी सुरक्षारक्षक असला तरी एटीएमबाहेर ‘एटीएम बंद आहे’ असा फलक झळकला होता. सहा ते सात एटीएममध्ये कागदांचा खच आढळून आला.

अशी आहेत मानके
एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेसाठी काय खबरदारी घ्यावी, याची मानके आरबीआयने ठरवून दिलेली आहे. यामध्ये एटीएम सेंटरमध्ये सायरन, एटीएमच्या बाहेर फ्लॅश लाईट, फक्त रेकॉर्डिंगच्या उद्देशाने कॅमेरे न बसविता आतील आणि बाहेरील अशा दोन्ही भागांचे चित्रीकरण करणारे कॅमेरे असावेत. स्वयंचलित लॉक होणारे दरवाजे तसेच सुरक्षारक्षकांची नेमणूक या मानकांचा समावेश आहे. अनेकदा बँकांचे एटीएम निर्जन स्थळी किंवा रस्त्यापासून काही अंतरावर असतात. त्यामुळे एटीएमला सायरन सिस्टीम बसविणे गरजेचे आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये परिसरातील रहिवासी मदतीला येऊ शकतात.

पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांची बैठक
शहरातील ९५ टक्के एटीएमला सुरक्षा रक्षक नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये बँकेच्या एटीएम सुरक्षिततेसाठी काय करता येईल, सुरक्षिततेच्या मानकांची अंमलबजावणी का व कशी करावी, याबाबत चर्चा झाली. 

एटीएम सेंटर ही बँकेची मालमत्ता आहे. तिचे संरक्षण करणे याची जबाबदारीही बँकेचीच आहे. आरबीआयनेही त्या संदर्भात काही मानके ठरवून दिलेली आहेत. मात्र, बँकांकडून या मानकांचे पालन केले जात नाही. त्यामुळे एटीएम सुरक्षेबाबत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना काही सूचना करण्यात आल्या आहे.
- विक्रम साळी, पोलीस उपायुक्त

काही एटीएमस्थळी समस्या आहेत. संबंधित बँकांना त्याबाबत सूचना दिल्या जातील. एटीएमची जबाबदारी संबंधित बँकांची आहे. 
- जितेंद्र झा, 
व्यवस्थापक, अग्रणी बँक 

 

Web Title: Security guards at only two of the ten ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम