पुन्हा खुर्ची सांभाळणार, सोमवंशींनी मागितली सुरक्षा
By admin | Published: April 10, 2015 12:30 AM2015-04-10T00:30:04+5:302015-04-10T00:30:04+5:30
शुक्रवारी सकाळी नाशिक आरोग्य विद्यापीठाच्या निर्णयानुसार आपण पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात पदभार सांभाळण्याकरिता जाणार असल्याचे ...
अमरावती : शुक्रवारी सकाळी नाशिक आरोग्य विद्यापीठाच्या निर्णयानुसार आपण पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात पदभार सांभाळण्याकरिता जाणार असल्याचे त्यांनी गुरूवारी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांना सांगितले.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात ‘डीन’च्या खुर्चीवरून पद्माकर सोमवंशी व दिलीप जाणे यांच्यामध्ये काही दिवसांपासून सुरू असलेली ओढाताण सर्वश्रुत आहे. संस्थेच्या अंतर्गत राजकारणाच्या अनुषंगाने ही ओढाताण सुरू आहे. परंतु नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाच्या निर्णयानुसार सोमवंशी यांचा पक्ष मजबूत आहे. जाणे यांनी डीनच्या कक्षाला कुलूप लावल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. पश्चात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सोमवंशी आणि जाणे यांना गुरूवारी सकाळी ११ वाजता एकत्र पोलीस आयुक्त कार्यालयात बोलविले होते. या दोघांसमवेत संस्थाध्यक्ष अरूण शेळके व सचिव व्ही.जी. भांबुरकर यांनादेखील पाचारण करण्यात आले होते. परंतु अध्यक्ष व सचिवांच्या व्यस्ततेचे कारण पुढे करून पीडीएमसीचे अधीक्षक बागल हे उपायुक्त घार्गे यांच्या कक्षात पोहोचले.
सोमवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले की, हायकोर्टाच्या निर्देशावरून विद्यापीठाच्या निर्णयाच्या आधारे ते अधिष्ठाता म्हणून पदभार सांभाळण्यास गेले होते. शुक्रवारी सकाळी ते पुन्हा 'डीन'चा पदभार सांभाळ्ण्याकरिता जाणार आहेत. ते पुन्हा आपल्या खुर्चीवर बसणार असल्याची स्पष्ट माहिती त्यांनी यावेळी पोलीस उपायुक्तांना दिली. यामुळे आपल्याला सुरक्षा दिली जावी, अशी मागणीही सोमवंशी यांनी यावेळी केली.
'डीन'च्या खुर्चीवर बसू देण्यास संस्थेला मज्जाव करायचा असेल तर त्यांच्याकडून लिखित स्वरूपात निर्देश यायला हवेत, असेही यावेळी सोमवंशी म्हणाले. दुसरीकडे प्रभारी डीन दिलीप जाणे यांचे म्हणणे आहे की, संस्थेने त्यांना प्रभार सोपविला आहे. जोवर ते कार्यमुक्त होत नाहीत, तोवर ते पदावरून हटणार नाहीत. सोमवंशी यांच्यासमवेत आपले व्यक्तिगत वैर नाही, असेही यावेळी जाणे यांनी स्पष्ट केले. संस्था आणि सोमवंशी यांच्या दरम्यानची ही लढाई आहे. संस्थेचा निर्णय यात अंतिम असेल, असेही स्पष्ट केले. हे प्रकरण आता वेगळेच वळण घेत आहे. (प्रतिनिधी)