हेमंत पवार बघा, नववीच्या विद्यार्थ्यांना गुणाकारही येईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:11 PM2018-01-29T23:11:13+5:302018-01-29T23:11:35+5:30
सरकारे ‘राइट टू एज्युकेशन’वर कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना, दुसरीकडे महापालिका शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : सरकारे ‘राइट टू एज्युकेशन’वर कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना, दुसरीकडे महापालिका शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. भौतिक सुविधांवर निधीची उधळण होत असताना शैक्षणिक गुणवत्ता माघारल्याचे क्लेशदायी चित्र आहे. अमरावतीच्या महापालिका शाळांची तशीच विदारक अवस्था असून, नववीच्या विद्यार्थ्यांना साधा गुणाकार येत नसल्याची गंभीर वस्तुस्थिती उघड झाली आहे.
गंभीर त्रुटींवर कटाक्ष
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांची बºयाच मुद्यांवर पाठराखण करणाºया आ. सुनील देशमुख यांनी महापालिका शाळेच्या या गंभीर दुरावस्थेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करणारे पत्र आयुक्तांना लिहिले आहे. १८ जानेवारीला आ. देशमुख यांनी नेहरू मैदान स्थित हिंदी व मराठी शाळेला प्रार्थनेच्या वेळी भेट दिली. त्यांच्यासमवेत पाचही झोनचे शाळा निरीक्षक होते. वर्गवार भेटी देत असताना नववीच्या विद्यार्थ्यांना ४१३ गणिले ९ या हा गुणाकार, पाच ज्ञानेंद्रियांची नावे विचारली. एक विद्यार्थी वगळता, इतर कुणालाही उत्तर देता आले नव्हते. पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांना चारचा पाढा म्हणता आला नाही.
गंभीर स्वरूपाच्या त्रुटी
मुख्याध्यापकासह शिक्षक गैरहजर असणे, त्यांचा रजेचा अर्ज नसणे, रजेबाबत उपस्थिती रजिस्टरमध्ये नोंद नसणे, पटसंख्या बहुतांश कमी असणे, वेळेपर्यंत चाचणी पेपर उपलब्ध करून देण्यात आले नसल्याच्या गंभीर त्रुटीही आढळून आल्या आहेत. स्वच्छता कर्मचारी असतानाही कमालिची अस्वच्छता आढळून आली.
देशमुखही म्हणतात, वचक नाही!
गुणवत्तावाढीसाठी शिक्षक गंभीर नसल्याचा विपरीत परिणाम गरिबांच्या पाल्यांवर होत आहे. शाळा निरीक्षकांच्या पाक्षिक अहवालातून या गंभीर स्थितीचे आकलन झाले नाही. कागदोपत्री अहवालाची पूर्तता तेवढी होत आहे. शिक्षण यंत्रणेवर प्रशासनाचा वचक नाही, अशी खंत आ.सुनील देशमुख यांनीही आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केली.