सीड प्लॉटच्या शेंगा पोचट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 05:00 AM2020-10-15T05:00:00+5:302020-10-15T05:00:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दर्यापूर : सीड प्लॉटसाठी खोसगी कंपनीला दिलेली सात हेक्टरहून अधिक जमीन शून्य उत्पन्न देऊन गेली. पूर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : सीड प्लॉटसाठी खोसगी कंपनीला दिलेली सात हेक्टरहून अधिक जमीन शून्य उत्पन्न देऊन गेली. पूर्ण वाढ झालेल्या सोयाबीनला शेंगा भरल्याच नाहीत. एकरी दहा क्विंटल बीजोत्पादन होईल व कंपनी ते विकत घेईल, हे आश्वासन फोल ठरले. आता सात दिवसांत नुकसानभरपाई न मिळाल्यास संबंधितांना न्यायालयात खेचण्याचा मनोदय शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद येथील शेतकरी दत्ता जळमकर यांनी मौजे सौंदळी शिवारातील भूमापन क्रमांक ७८ मधील ७ हेक्टर ८३ आर जमिनीपैकी ८३ आर जमीन अकोला येथील सुमितर इंडिया ऑरगॅनिक या कंपनीला सोयाबीन सीड प्लॉटसाठी करार पद्धतीने दिली होती. यामध्ये कंपनीने दिलेले बियाणे पेरण्यात आले. या शेतात एकरी १० ते १५ क्विंटल उत्पादन होईल, असा दावा कंपनीने केला होता. या शेतात निघणारा माल कंपनी स्वत: खरेदी करून त्याचा वापर बियाण्यासाठी केला जाईल, अशी हमी दिली होती.
कंपनीने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार पिकाची निगा राखण्यात आली. दत्ता जळमकर यांनी जमिनीची योग्य मशागत करून खते व रासायनिक फवारणी केली होती. त्यामुळे शेतातील पीक दमदारपणे उभे झाले होते. पण, झाडांना लागलेल्या शेंगामध्ये दाणे भरले नाहीत. त्या शेंगा पोचट राहिल्याने शेतात उत्पन्न निघाले नसल्याची वस्तुस्थिती शेतकऱ्याने वकिलामार्फत अकोला येथील सोयाबीन बियाणे कंपनीला दिलेल्या नोटीसमध्ये मांडली आहे.
याप्रकरणी सात दिवसांच्या आत कंपनीने शेताची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी १३ ऑक्टोबरला दिलेल्या नोटीसमधून केली.
कंपनीला वकिलामार्फत नुकसान भरपाईची नोटीस पाठवली आहे. मला सात दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास न्यायालयात जाईल.
- दत्ता जळमकर,
शेतकरी, सौंदळी
शेतात मॉइश्चर वा व्हायरसची समस्या उद्भवल्याने शेंगा न भरण्याची समस्या उद्भवल्याची शक्यता आहे. शेतकरऱ्याची नोटीस अद्याप प्राप्त झालेली नाही.
- राजीव पाटील,
प्रोजेक्ट मॅनेजर सुमितर इंडिया