बियाण्यांची विक्री, साठेबाजीवर ६२ पथकांचा ‘वॉच‘
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:13 AM2021-05-18T04:13:45+5:302021-05-18T04:13:45+5:30
अमरावती : यंदाच्या खरिपासाठी पेरणीपूर्व मशागतीची लगबग आता शिवारांमध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे बियाणे बाजारातील हालचाली गतिमान होत आहे. ...
अमरावती : यंदाच्या खरिपासाठी पेरणीपूर्व मशागतीची लगबग आता शिवारांमध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे बियाणे बाजारातील हालचाली गतिमान होत आहे. या पार्श्वभूमीवर बियाण्यांचा काळाबाजार व शेतकऱ्यांशी दगाफटका होऊ नये, यासाठी कृषी विभाग आता सतर्क झालेला आहे. सद्यस्थितीत पश्चिम विदर्भात ६२ भरारी पथकांचे गठन करण्यात आलेले असून, १२३ संनियत्रण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे.
पश्चिम विदर्भात यंदा ३२ लाख २८ हजार हेक्टरमध्ये खरिपाचे क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी किमान १२ लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. सर्वाधिक टंचाई सोयाबीन बियाण्यांची राहण्याची शक्यता आहे. या पिकाकरिता १० लाख ७४ हजार ९०० क्विंटल बियाणे लागणार आहे. गत हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाल्याने यंदा चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची मारामार राहणार आहे. याशिवाय उगवणशक्तीची समस्यादेखील निर्माण होण्याची शक्यता आहे. महाबीजद्वारा अल्पसा पुरवठा होणार असल्याने खासगी कंपन्यांचे बियाणे महागणार आहे. त्यामुळे बियाण्यांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याकरिता कृषी विभागाने भरारी पथकांचे गठन केल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
तालुकास्तरावर ५६ भरारी पथके
पश्चिम विदर्भात तालुकास्तरावर ५६, जिल्हास्तर ५ व विभागस्तर १ असे ६२ भरारी पथकांचे गठन करण्यात आलेले आहे. यात बुलडाणा जिल्ह्यात १४, अकोला ८, वाशिम ७, अमरावती १६ व यवतमाळ जिल्ह्यात १७ पथकांचे गठन कृषी विभागाने केले आहे. या पथकांद्वारा बियाण्यांचा काळाबाजार, बोगस बियाण्यांची विक्री रोखणार व बियाण्यांचे नमुने घेणार आहे.
बॉक्स
सनियंत्रण कक्षात होणार तक्रारींची नोंद
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंद करण्यासाठी विभागात १२३ संनियत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यात ११२ कक्ष तालुकास्तरावर, १० जिल्हास्तरावर व एक विभागस्तरावर राहणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात २८, अकोला जिल्ह्यात १६, वाशिम जिल्ह्यात १४, अमरावती जिल्ह्यात ३१ व यवतमाळ जिल्ह्यात ३४ संनियत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे.