दुष्काळात बियाणे महागले
By admin | Published: June 11, 2016 11:57 PM2016-06-11T23:57:05+5:302016-06-12T00:01:59+5:30
: सततची नापिकी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये शेतकरी होरपळत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात २५ ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे.
शेतकऱ्यांचे शोषण : महाबीजच्या बियाण्यांतही ४० टक्क्यांची दरवाढ
अमरावती : सततची नापिकी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये शेतकरी होरपळत असताना महाबीजने बियाण्यांच्या दरात २५ ते ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे शासनाने बियाणे व खतांच्या किमती स्थिर ठेवण्याची हमी दिली असताना महाबीजने केलेली दरवाढ म्हणजे विश्वासघात केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या, खरीपपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे व अशा स्थितीत महाबीजने बियाण्यांची दरवाढ केली आहे. आतापर्यंत स्वस्त आणि रास्त दरात राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज उपलब्ध करून देत आहे. डाळवर्गीय बियाण्यांच्या किमतीत तब्बल ५० टक्यांनी वाढ केली आहे. महाबीजने या निर्णयामुळे बाजारात सर्वच खासगी बियाणे विक्रेत्यांनी बियाण्यांच्या दरात वाढ केली आहे.
मागील वर्षीची खरीप व रबीचा हंगाम पावसाअभावी वाया गेला. पेरणीचा खर्च निघाला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत शासनाने बियाण्यांच्या दरात अनुदान द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना त्यांच्या पदरी निराशा आली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी महाबीजने नफा कमविण्यासाठी दरवाढ केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
डाळवर्गीय बियाण्यात ५० टक्क्यांची दरवाढ
मागील वर्षीपासून डाळीची किंमत २०० रुपयापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे यंदा शेतकरी डाळवर्गीय पिके अधिक घेणार बाजार डाळवर्गीय बियाण्यांची टंचाई आहे अश्या प्रतिकुल परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी महाबीजने डाळवर्गीय बियाण्यांच्या किमती ५० टक्यापर्यंत वाढविल्या आहेत.