महामंडळाचे बियाणे ठरले अवसानघातकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:33+5:302021-09-06T04:16:33+5:30
सोयाबीन वांझोटे, पथ्रोट येथील शेतकऱ्याने दोन एकरात घातला ट्रॅक्टर पथ्रोट : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे सोयाबीन बियाणे वांझोटे निघाल्याने ...
सोयाबीन वांझोटे, पथ्रोट येथील शेतकऱ्याने दोन एकरात घातला ट्रॅक्टर
पथ्रोट : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे सोयाबीन बियाणे वांझोटे निघाल्याने पथ्रोट येथील एका शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रात ट्रॅक्टर घालू पीक मोडून काढले. यापूर्वी आठ एकरातील उडीदही त्यांना निराश करून गेला.
महाबीज हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. या उपक्रमातील बियाणेच अवसानघातकी निघाल्याचा अनुभव पथ्रोट येथील शेतकऱ्याने घेतला. राज्यातील शेतकऱ्यांना प्रचलित वाणांचे गुणवत्तापूर्वक बियाणे मिळण्याच्या उद्देशाने साधारणतः सन १९६० च्या सुमारास शासनाने तालुका बीजगुणन केंद्राची स्थापना करून बीजोत्पादनाला सुरुवात केली. या तालुका बीजगुणन केंद्रावरुन उत्पादित बियाणे शासनाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत होते. घरचेच बियाणे वापरण्यापेक्षा शासनाकडून पुरवठा केलेल्या त्याच वाणाच्या बियाण्यापासून अधिक उत्पादन मिळण्याच्या आशेमुळे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. पथ्रोट येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या महाबीज सोयाबीन बियाणे शेतात पेरले. मशागत, रासायनिक खते, कीटकनाशकासह बुरशीनाशकं फवारणीचा एकूण खर्च एकरी १० ते १५ हजार रुपये केला. फुलोरा अवस्थेत पीक आले असता, तुरळक फुले लागली. नंतर शेंगा लागल्याच नाही. उत्पन्न होणार नसल्याची लक्षणे दिसल्याने पथ्रोट येथील योगेश दुबे यांनी शनिवारी उभ्या सोयाबीन पिकात ट्रॅक्टर चालवून हे पीक वखरून टाकले. यापूर्वी उडिदाला शेंगा न लागल्याने आठ एकर क्षेत्रातील पीक वखरले होते, हे विशेष.