एकटी पाहून तो आला सर्वस्व लुटायला, तिने केला प्रतिकार
By प्रदीप भाकरे | Published: August 25, 2023 03:39 PM2023-08-25T15:39:07+5:302023-08-25T15:40:36+5:30
शिवारात विनयभंग : नांदगावच्या प्रशांत वैद्यविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती : नराधमाच्या हाताला हिसका देत निर्वस्त्र स्थितीत आईवडिलांकडे धाव घेत एका अल्पवयीन मुलीने प्रतिकार करीत स्वत:चे शील वाचविले. १८ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका शिवारातील घरात हा प्रकार घडला. या प्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी आरोपी प्रशांत वैद्य (५५, नांदगाव खंडेश्वर) याच्याविरुद्ध विनयभंग, ॲट्रॉसिटी व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.
पीडितेसह तिचे आईवडील आरोपीच्या शिवारातील घराची देखभाल करतात. ते कुटुंब तेथेच वास्तव्यास आहे. १८ ऑगस्ट रोजी त्या अल्पवयीन मुलीचे आईवडील व भाऊ शेतीची कामे करीत होती, तर मुलगी खोलीत एकटीच होती. दुपारी ४ च्या सुमारास आरोपी प्रशांत वैद्य हा तिच्या रूममध्ये शिरला. तिला दुसऱ्या खोलीत जबरदस्तीने नेत त्याने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याचा प्रतिकार करीत त्याच्याशी दोन हात केले. त्याच्या हाताला हिसका देत ती निर्वस्त्र स्थितीत शेतातच असलेल्या आईवडिलांकडे पळत सुटली. पोटच्या लेकराची ती दैनावस्था पाहून आईवडिलांनी तिला घेऊन प्रथम खोली गाठली. तिला धीर दिला. त्यावेळी तक्रारीसाठी कुणाचे धाडस होत नव्हते. मात्र, त्यानंतर धाडसाने तक्रार नोंदविण्यात आली. २४ ऑगस्ट रोजी रात्री १०:३३ च्या सुमारास प्रशांत वैद्यविरुद्ध मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पीडितेचे नातेवाईक अमरावती शहर परिसरात राहत असल्याने ते आधी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी घटनास्थळाची खात्री करून तो गुन्हा आमच्याकडे वर्ग केला. तत्काळ गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध सुरू आहे.
- प्रकाश तायडे, ठाणेदार, मंगरूळ चव्हाळा