‘ऊर्ध्व वर्धा’चे भूकंपमापक यंत्र दोन वर्षांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 05:00 AM2021-07-12T05:00:00+5:302021-07-12T05:00:41+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात ४.४ रिश्टर स्केल असलेला सौम्य स्वरूपाचा भूकंप रविवारी सकाळी ८.३३ वाजता झाला. त्यानंतर अनेकांनी ऊर्ध्व वर्धा विभागाकडे पार्डी येथील केंद्रावर काय नोंद झाली याची विचारणा केली असता, हे यंत्र दोन वर्षांपासून बंदच असल्याचे समोर आले. सुमारे ३० वर्षांपूर्वी हे सेस्मोमीटर पार्डी येथे कार्यान्वित केले होते. या यंत्राद्वारे किमान पाच हजार किमी परिसरात कुठेही भूकंप झाल्यास त्यांची नोंद घेतली जायची.
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यवतमाळ जिल्ह्यात रविवारी सौम्य भूकंप झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात काय स्थिती आहे. यासाठी संपर्क साधला असता, यंत्र (सेस्मोमीटर) दोन वर्षांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. येथे डिजिटल स्वरुपातील नवे यंत्र बसविण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचे यंत्रणेद्वारा सांगण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात ४.४ रिश्टर स्केल असलेला सौम्य स्वरूपाचा भूकंप रविवारी सकाळी ८.३३ वाजता झाला. त्यानंतर अनेकांनी ऊर्ध्व वर्धा विभागाकडे पार्डी येथील केंद्रावर काय नोंद झाली याची विचारणा केली असता, हे यंत्र दोन वर्षांपासून बंदच असल्याचे समोर आले. सुमारे ३० वर्षांपूर्वी हे सेस्मोमीटर पार्डी येथे कार्यान्वित केले होते. या यंत्राद्वारे किमान पाच हजार किमी परिसरात कुठेही भूकंप झाल्यास त्यांची नोंद घेतली जायची. मात्र, आता ते कालबाह्य झाल्याने या यंत्रात बिघाड झाल्यास त्याचे सुटे पार्ट मिळत नाही व प्रत्येक वेळी नाशिक येथील ‘मेरी’ संस्थेकडे घेऊन जाणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे या विभागाद्वारा तंत्रज्ञालाचा येथे बोलावून दुरुस्तीचा प्रयत्न केला गेला. आता हे सेस्मोमीटर बदलण्यात येऊन जागतिक बँकेच्या ‘ड्रिप-२’ प्रकल्पात बदलण्यात येणार आहे. तसा प्रस्तावदेखील नाशिक येथील संबंधित संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती केंद्रांचे अभियंता गजानन साने यांनी दिली.तीन वर्षांपूर्वी धारणी तालुक्यातील तीन-चार गावांत धरणीकंपामुळे भांडी पडल्याने नागरिकांत भूकंपाची धास्ती होती. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उर्ध्व वर्धा विभागाकडे भूकंप नोंदीची मागणी केली. तेव्हाही यंत्र बंद असल्याने त्यांनी नव्या यंत्रासाठी पाठपुरावा केला होता.
डिजिटल सेस्मोमीटर बसविणार
सध्या अस्तित्वात असलेले भूकंपमापक यंत्र कालबाह्य झालेले आहे व नादुरुस्त आहे. त्यामुळे हे यंत्र बदलण्यात येऊन डिजिटल यंत्र बसविण्यात येणार आहे. याासाठी किमान ४० ते ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे व तो कुणी करायचा, यावरुन हे प्रकरण रेंगाळले आहे. आता जागतिक बँकेच्या ‘ड्रिप-२’ प्रकल्पांतर्गत यंत्र बदलण्यात येत आहे. तसा प्रस्ताव उर्ध्व वर्धा विभागाद्वारा संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात आला आहे.
मोबाईललाही 'अटॅच' होणार यंत्र
केंद्रांवर बसविण्यात येणारे नवे डिजिटल यंत्र हे मॅन्युअली राहणार नाही. ते मोबाईललाही अटॅच होत असल्याने कुठेही भूकंप झाल्यास लगेच माहिती मिळेल. यासाठी ‘डॅम रिहॅब्युटेशन इप्रुमेंट प्रोग्राम’ (ड्रीप-२) मध्ये ५० रुपये लाखांचे हे यंत्र खरेदी करण्यात येणार आहे. याद्वारे ५००० किमीवरील भूकंपाची नोंद होईल.
चौकीदार सांभाळतो केंद्र, घेतो नोंदी
या प्रकल्पाचे पार्डी येथील सेस्मोमीटरच्या केंद्रांवर असलेला चतुर्थश्रेणी कर्मचारी व चौकीदार व्यक्ती हे भूकंपमापक केंद्र सांभाळत असल्याचे गंभीर बाब समोर आली आहे. याशिवाय भूकंपाच्या नोंदी घेण्याचे कामदेखील चौकीदारामार्फतच केले जात आहे. स्टॉफ कमी असल्याने त्याच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे या विभागाने सांगितले.
केंद्रावरील यंत्र रिप्लेसमेंट करण्यात येणार आहे. यासाठी नाशिकच्या संबंधित संस्थेकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे.
- रश्मी देशमुख,
अधीक्षक अभियंता, ऊर्ध्व वर्धा
सर्व तहसीलदारांना रविवारी सकाळी सूचना देऊन माहिती मागविली आहे. अमरावती जिल्ह्यात कुठेही तसे धक्के जाणवले नाहीत.
- नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी