मांजरखेड परिसरात वाघ, बिबट्याची दहशत, जेरबंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:13 AM2021-03-08T04:13:39+5:302021-03-08T04:13:39+5:30
अमरावती : चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) परिसरात वाघ, बिबट दिसून येत असून, शेतकरी, ग्रामस्थांमध्ये कमालीची दहशत आहे. एखादी ...
अमरावती : चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (कसबा) परिसरात वाघ, बिबट दिसून येत असून, शेतकरी, ग्रामस्थांमध्ये कमालीची दहशत आहे. एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वी वाघ, बिबट्यांना जेरबंद करा, अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी वन खात्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
आ. अडसड यांनी ६ मार्च रोजी वन खात्याचे प्रधान सचिवांना पत्र लिहून मांजरखेड (कसबा) या भागातील शेतकरी, ग्रामस्थांची कैफीयत मांडली आहे. बिबट्याने गत काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे, तर वाघ मांजरखेड शेतशिवारात दिसून आल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. वाघ दिसून आल्यामुळे शेतकरी, मजुरांचे आर्थिक नुकसान होत आहे. वाघाचे प्राणघातक हल्ला केल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर काही महिन्यांपूर्वी मांजरखेड भागात बिबट्याने गुरे-ढोरे फस्त केले आहेत. बिबट्यांचा मुक्त संचार ही नित्याचीच बाब झाली आहे. जंगलात कामानिमित्त शेतकरी, शेतमजुरांना ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने वाघ, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.