अमरावतीत सहा अधिका-यांच्या घरून दस्तऐवज जप्त; बाजोरिया कन्स्ट्रक्शनला बनावट प्रमाणपत्राचे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 10:41 PM2017-11-09T22:41:36+5:302017-11-09T22:42:38+5:30
बाजोरिया कन्ट्रक्शन कंपनीला बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक करणारे सहा अभियंत्यांच्या घराची झडती एसीबीच्या पाच पथकांनी घेतली. काही महत्त्वाचे दस्तऐवजही जप्त करण्यात आलेत.
अमरावती : बाजोरिया कन्ट्रक्शन कंपनीला बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक करणारे सहा अभियंत्यांच्या घराची झडती एसीबीच्या पाच पथकांनी घेतली. काही महत्त्वाचे दस्तऐवजही जप्त करण्यात आलेत. एका अधिका-याने चौकशीसाठी हजर न राहता उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली आहे.
गुन्हे नोंदविलेल्या सात अभियंत्यांपैकी सहा व दोषी आढळलेल्या कंत्राटदाराला चौकशीसाठी वेळोवेळी बोलावण्यात येत आहे. तपासात सहकार्य मिळत असल्याने कुणालाही याप्रकरणी अटक करण्यात आली नसल्याने एसीबीच्या अधिका-यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात ४ नोव्हेंबर रोजी खामगाव शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. यामध्ये आठ जणांचा समावेश असून, सात वरिष्ठ अभियंता आहेत. अमरावतीच्या तत्कालीन मुख्य अभियंत्याचा यामध्ये समावेश आहे. सातपैकी पाच जण सेवानिवृत्त झाले असल्याची माहिती एसीबीने दिली. एसीबीच्या पाच वेगवेगळ्या पथकांनी ५ नोव्हेंबरला औरंगाबाद, पुणे, वर्धा, अमरावती येथे एकाच वेळी प्रकरणात अडकलेल्या अभियंत्यांच्या निवास्थानांची झडती घेतली व तपासात सहकार्य करण्यास बजावले. यानंतर सहा अभियंते एसीबीसमोर हजर झाले.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळवून देण्यासाठी सदर अभियंत्यांनीच अर्थव्यवहार करीत बनावट प्रमाणपत्र तयार केले. याकरिता पाच वर्षांच्या आर्थिक वार्षिक उलाढालीची सरासरी विचारात न घेता, केवळ दोेनच वर्षांची सरासरी विचारात घेऊन त्यावर २० टक्के सूट देण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील यांनी या कंपनीला निविदेसाठी पात्र ठरवले. पूर्वअर्हता तपासणी समितीनेही विरोध दर्शविला नाही. चौकशीअंती या प्रकरणात सात अभियंते दोषी आढळले. एसीबीचे निरीक्षक सोपान भाईक यांच्या तक्रारीवरून मजीप्राचे चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता संजय वाघ, जलसंपदा विभागाचे अमरावती येथील तत्कालीन मुख्य अभियंता एम.व्ही. पाटील, पूर्वअर्हता पात्रता तपासणी समितीतील सो.रा. सूर्यवंशी (मुख्य अभियंता, गोसे खुर्द, सिंचन भवन नागपूर), शरद गावंडे (अधीक्षक अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग), भा.शा. वावरे (अधीक्षक अभियंता, पाटबंधारे), भीमाशंकर अवधूत पुरी (अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती सिंचन प्रकल्प, नाशिक), आर.जी. मुंदडा (कार्यकारी अभियंता, मन प्रकल्प, खामगाव) तसेच बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनी (यवतमाळ) चे संचालक सुमित रमेशचंद्र बाजोरिया यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यांच्यापैकी संजय वाघ व राजू मुंदडा हे शासकीय सेवेत आहेत. त्यांच्या निवासस्थानी कसून चौकशी करण्यात आली व महत्त्वाच्या दस्तऐवजांची झाडझडती घेतल्याची माहिती एसीबीचे अमरावती परिक्षेत्र अधीक्षक एस.वाय. धिवरे यांनी दिली.
वाघ यांची अटकपूर्व जामीनसाठी धडपड
महाराष्ट्र जीवन प्रधिकरण चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना चौकशीसाठी हजर राहण्यास एसीबीने बजावले होते. पण, प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी हजर न राहता वाघ यांनी अटकपूर्व जामीनसाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे. याप्रकरणी वाघ यांच्या चंद्रपूर येथील घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. आय. धिवरे यांनी दिली.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून दस्तऐवज सादर
प्रकरणाच्या तपासासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने या प्रकल्पासंदर्भातील दस्तऐवज मागविले होते. ते गुरुवारी एसीबीला प्राप्त झाले आहेत. याप्रकरणी सर्व सात आरोपींचे बयान नोंदविण्यात आले. त्याबाबत एसीबीच्या अधिका-यांनी मौन बाळगले असून, योग्य वेळी आरोपीला अटक करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
प्रकरणाचा दोन वर्षे तपास करून गुन्हा नोंदविला आहे. अभियंत्यांच्या निवासस्थानाची झडती पथकाने घेतली आहे. तपासाचा भाग म्हणून आरोपींना अटक केली नाही; परंतु चौकशीसाठी बोलावले आहे.
- एस.वाय. धिवरे, पोलीस अधीक्षक, एसीबी, अमरावती परिक्षेत्र