आत्मविश्वासावर सुमैया ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:02 PM2019-02-02T23:02:25+5:302019-02-02T23:02:42+5:30
ईश्वराने पृथ्वीतलावर पाठविलेच आहे, तर पुढील भविष्याचीही चिंता तोच करेल, आपण फक्त चांगले कर्म करीत राहावे, आपल्या कर्मावर विश्वास ठेवून केलेल्या कामगिरीतून नक्कीच सुसह्य जीवन जगता येते, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्यातील दोन्ही पायांनी निकामी असलेली विद्यार्थिनी सुमैया पठाण हिने व्यक्त केला.
इंदल चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ईश्वराने पृथ्वीतलावर पाठविलेच आहे, तर पुढील भविष्याचीही चिंता तोच करेल, आपण फक्त चांगले कर्म करीत राहावे, आपल्या कर्मावर विश्वास ठेवून केलेल्या कामगिरीतून नक्कीच सुसह्य जीवन जगता येते, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्यातील दोन्ही पायांनी निकामी असलेली विद्यार्थिनी सुमैया पठाण हिने व्यक्त केला.
अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलावर आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचा शनिवारी दुसरा दिवस. राज्यभरातून दिव्यांग विद्यार्थ्यांना आपल्या कला, गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील अस्थिव्यंग निवासी विद्यालयाच्या क्रीडा शिक्षक मंजूषा गर्जे यांच्या मार्गदर्शनात चमू शहरात दाखल झाली आहे. यातील इयत्ता सातवीची बहुदिव्यांग विद्यार्थिनी सुमैया पठाण हिने सॉफ्टबॉल थ्रो स्पर्धेत १२ ते १६ वर्षे गटात सुवर्णपदक मिळविले. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असली तरी कमरेपासून पांगळी असल्याने दोन्ही हातांच्या साह्याने चालते. त्याच हातांनी व्हील चेअर फिरवत १०० व २०० मीटर शर्यतीत सुमैयाने द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. यापूर्वी गेवराई तालुक्यातील तरनोळा येथील व्हील चेअर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. सुमैयाने वडील खुद्दस पठाण हे गवंडी आहेत. आई भाजीविक्री करून संसाराचा गाडा हाकतात.